
जम्मू कश्मिरमधील उधमपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. माजलता तहसीलमधील खुबन परिसरात झालेल्या या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, खुबन परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस, विशेष कृती गट (SOG) आणि इतर सुरक्षा दलांनी बुधवारी रात्री परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलांनी परिसराला घेरले असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक झाली. या कारवाईदरम्यान रॉकेटसदृश आवाजही ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. परिसरातील दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि अंधारामुळे रात्रीच्या वेळी कारवाई मर्यादित करण्यात आली. मात्र, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू ठेवली आहे.
दरम्यान, या भागात आणखी दहशतवादी लपले असल्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा दलांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांच्याशी संबंधित इतर माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे.




























































