
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत दमदार कामगिरी सुरू असतानाच हिंदुस्थानच्या निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी घरच्या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा केली आहे. वनडे संघात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे स्थान कायम ठेवण्यात आले असून शुभमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा कायम आहे. दुसरीकडे टी-20 संघात युवा चेहऱयांवर पुन्हा विश्वास दाखवताना वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे. तसेच श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद कायम आहे.
रोहित आणि विराट यांना वनडे संघात कायम ठेवण्याचा निर्णय विशेष लक्षवेधी ठरला आहे. दोन्ही दिग्गजांच्या वनडे कारकिर्दीबाबत चर्चा सुरू असतानाच निवड समितीने त्यांच्यावरचा विश्वास कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. गिलच्या नेतृत्वाखाली रोहित-विराटचा अनुभव, राहुलची यष्टिरक्षणाची जबाबदारी आणि जैसवाल-गायकवाडसारख्या युवा फलंदाजांची साथ अशी दमदार फलंदाजीची फळी हिंदुस्थानकडे आहे.
…तरीही वैभव कायम
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांच्या तुलनेत या संघात काही महत्त्वाचे बदल दिसत आहेत. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्यात आला आहे. मात्र वैभव सूर्यवंशीला अद्याप अंतिम अकरामध्ये संधी मिळालेली नसतानाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत आपली दावेदारी मजबूत केली. दुसऱया सामन्यात संजूने वादळी अर्धशतक ठोकले, तर अभिषेकनेही आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम अकरा निवडताना श्रेयस अय्यरसमोर फलंदाजीच्या क्रमाबाबत मोठी स्पर्धा असणार आहे.
कुलदीपची एन्ट्री; मयंक–प्रिन्सवर नजर
टी-20 संघातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे कुलदीप यादवचे पुनरागमन. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीमध्ये प्रिन्स यादव आणि मयंक यादव या नावांची भर पडली आहे. त्यामुळे टी-20 संघात वेग, फिरकी आणि अष्टपैलू पर्यायांचे मिश्रण अधिक विस्तारले आहे.
अफगाणिस्तान मालिकेतील कामगिरीनंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. विशेषतः वैभव सूर्यवंशीच्या नावाकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष असेल. अंतिम अकरामध्ये त्याला कधी संधी मिळते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ ः शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गूरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकीब नबी, यशस्वी जैसवाल आणि नमन धीर.
विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी संघ ः श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव आणि मयंक यादव.
रोहित–विराटपासून वैभवपर्यंत…
एका बाजूला वनडे संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा अनुभव कायम ठेवण्यात आला आहे; तर दुसऱया बाजूला टी-20 संघात वैभव सूर्यवंशीसारख्या युवा चेहर्याला पुढे नेण्याची प्रक्रिया सुरूच आहे. म्हणजेच हिंदुस्थानच्या निवड समितीने एका संघात अनुभव आणि दुसऱया संघात युवा आक्रमकतेचा समतोल साधला आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा धडाका संपण्याआधीच वेस्ट इंडिजविरुद्धची रणधुमाळी निश्चित झाली आहे. आता रोहित-विराटचा क्लास, गिलचे नेतृत्व, श्रेयसचा आक्रमक टी-20 चेहरा, अभिषेक-संजूची फटकेबाजी आणि वैभव-मयंक-प्रिन्सचा युवा जोश वेस्ट इंडिजला किती आव्हान देतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
























































