
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिघी पोर्टमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांवर नोकऱ्यांची खैरात केली जात आहे.
याविरोधात श्रीवर्धनच्या १८ गावांतील हजारो बेरोजगार तरुणांनी दिघी पोर्टवर धडक देत जोरदार आंदोलन केले. खारगाव बुद्रुक ते दिघी पोर्ट अशा काढलेल्या या बाईक रॅलीमधील भूमिपुत्रांच्या आक्रोशाने परिसर दणाणून गेला. स्थानिकांवर अन्याय केला तर खबरदार.. तीव्र आंदोलन करू, असा इशाराच यावेळी देत दिघी पोर्ट प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
आरोग्य सेवेचीदेखील बोंबाबोंब
श्रीवर्धनमध्ये आरोग्य सेवेचीदेखील बोंबाबोंब असून रुग्णांना अनेकदा उपचारासाठी मुंबई, पुणे गाठावे लागते. याबाबतदेखील आंदोलकांनी आवाज उठवला. बाईक रॅलीपूर्वी भूमिपुत्रांनी म्हसळा ग्रामीण रुग्णालय, खारगाव, बोलीं, दिघी येथील प्राथमिक रुग्णालयांवर धडक देत आरोग्य व्यवस्था सुधारा, असे निवेदन दिले असल्याची माहिती आगरी युवा संघाचे अध्यक्ष धनंजय चौलकर यांनी दिली.
नाही तर खुर्चा खाली करा !
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही श्रीवर्धनमध्ये रोजगाराच्या संधी नसल्याने येथील तरुणांना मुंबई, पुणे गाठावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश घरांना टाळे असून पिकत्या जमिनी ओस पडल्या आहेत. या भयंकर परिस्थितीविरोधातील चीड आजच्या आंदोलनातून दिसून आली. आंदोलकांनी जोरदार घोषणा देत आमच्या हक्काचा रोजगार हिरावाल तर खबरदार.. न्याय द्या नाही तर खुर्च्छा खाली करा, असा इशाराच सरकारला दिला.
रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर अत्यंत महत्त्वाचे बंदर असून याठिकाणी लढाऊ आणि व्यावसायिक जहाजांची बांधणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे १५ हजार थेट आणि जवळपास ९० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. मात्र या प्रकल्पात स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती केली जात असल्याचा आरोप १८ गाव आगरी युवा संघाने केला आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही दिघी पोर्ट प्रशासनाने कानाडोळा केल्याने संतप्त झालेल्या येथील हजारो तरुणांनी आज बाईक रॅली काढत सरकारविरोधात आंदोलन केले. खारगाव बुद्रुक ते दिघी पोर्ट अशा निघालेल्या रॅलीत तरुणांबरोबरच नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घेत सरकारच्या कारभाराचा निषेध केला.
























































