
डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांच्या चिमुरडीवर 85 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली असली तरी परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
पीडित चार वर्षीय मुलगी रामनगर परिसरात आपल्या कुटुंबीयांसह राहते. शेजारी राहणाऱ्या 85 वर्षीय व्यक्तीने तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर रामनगर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित वयोवृद्ध व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. प्राथमिक तपासानंतर त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रामनगर पोलीस करीत असून, घटनेमागील संपूर्ण परिस्थिती तसेच अन्य बाबींचा तपास केला जात आहे.



























































