एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटनेच्या तपासावर पारदर्शकतेचा आरोप, अमेरिकेतील संस्थेचे एएआयबीला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटनेच्या सुरू असलेल्या तपासात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप अमेरिकेतील फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी (FAS) या संस्थेने केला आहे. या संस्थेने Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) ला पत्र लिहून तपासाशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे. 12 जून 2025 रोजी झालेल्या या दुर्घटनेत 260 जणांचा मृत्यू झाला होता.

27 ऑगस्ट 2026 रोजी AAIBचे महासंचालक जी. व्ही. जी. युगंधर यांना पाठवलेल्या पत्रात FASचे कार्यकारी संचालक एड पिअर्सन यांनी AAIBच्या तपासातील पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त VT-ANB विमानाशी संबंधित शेकडो अधिकृत, मात्र सार्वजनिक न केलेली कागदपत्रे यूके एएआयबीच्या एका तज्ज्ञामार्फत AAIBकडे पाठवण्यात आली होती.

या कागदपत्रांमध्ये विमानाच्या विद्युत, इलेक्ट्रॉनिक आणि फ्लाइट कॉम्प्युटर यंत्रणांमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आणि प्रणालीगत त्रुटींची माहिती असल्याचा दावा FASने केला आहे. दुर्घटनेची संभाव्य कारणे निश्चित करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची असल्याचेही संस्थेने म्हटले आहे.

महत्त्वाच्या कागदपत्रांची तपास अहवालात दखल नाही?

ICAO Annex 13, Section 5 चा हवाला देत FASने तपास करणाऱ्या देशाने अपघाताशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती गोळा करून तिची नोंद आणि विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, या कागदपत्रांचा AAIBच्या प्राथमिक अहवालात, त्यानंतरच्या अंतरिम अहवालात किंवा त्यानंतरच्या कोणत्याही टप्प्यावर उल्लेख करण्यात आलेला नाही, असा आरोप पिअर्सन यांनी केला आहे.

FASच्या पत्रानुसार, VT-ANB विमानाच्या ACARS आणि Aircraft Health Monitoring (AHM) या डेटा प्रणालींमध्ये विमानाच्या यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याचे संकेत होते. दुर्घटनेपूर्वी विशिष्ट बिघाड नेमक्या कोणत्या वेळी झाले, याची माहितीही या डेटामध्ये असल्याचा दावा संस्थेने केला आहे. मात्र, हा डेटा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचे FASने म्हटले आहे.

तसेच, यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याचे संकेत देणारी माहिती तपास यंत्रणेकडे असतानाही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी कोणत्याही अंतरिम सुरक्षा शिफारशी किंवा इशारे जारी करण्यात आलेले नाहीत, असा आरोप FASने केला आहे. तपासाचा दोष केवळ एका वैमानिकावर ठेवण्याच्या दिशेने AAIBचा कल असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. या सर्व बाबींवर AAIBने तातडीने औपचारिक स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित कागदपत्रांचा तपासाच्या सार्वजनिक नोंदीत समावेश करावा, अशी मागणी FASने केली आहे.

AAIBने काय म्हटले?

दरम्यान, FASने 21 ऑगस्ट 2026 रोजी केलेल्या आधीच्या पत्रव्यवहाराला उत्तर देताना AAIBने 26 ऑगस्ट 2026 रोजी पत्र पाठवले होते. FASने AI-171 तपासासंदर्भात दिलेली तांत्रिक माहिती आणि इतर माहिती 10 जून 2026 रोजी यूके एएआयबीच्या तज्ज्ञामार्फत प्राप्त झाली असून तपास पथकाने तिची तपासणी केली आहे, असे AAIBने स्पष्ट केले.

तपास Aircraft (Investigation of Accidents and Incidents) Rules, 2025 तसेच ICAO Annex 13 मधील लागू तरतुदींनुसार केला जात असल्याचे AAIBने म्हटले आहे. तपास निष्पक्ष आणि तटस्थ पद्धतीने सुरू असल्याचेही यंत्रणेने स्पष्ट केले.

तपासाशी संबंधित सर्व महत्त्वाची तथ्यात्मक माहिती आणि पुरावे तपास पथकाकडे उपलब्ध असून त्यांचा तपास प्रक्रियेचा भाग म्हणून योग्य पद्धतीने अभ्यास केला जात असल्याचे AAIBने सांगितले.

एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटनेचा तपास अद्याप सुरू असून AAIBकडून या दुर्घटनेचा अंतिम अहवाल अद्याप जारी करण्यात आलेला नाही.