
नागपूरमध्ये आदिवासी वसतिगृहांच्या व्यवस्थापनावरून आता वाद निर्माण झाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी बुधवारी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग आणि ‘स्वर्गीय लक्ष्मण मानकर ट्रस्ट’ यांच्यातील सामंजस्य कराराची प्रत फाडून टाकली. या कराराला विरोध करत त्यांनी तो रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
आदिवासी विद्यार्थ्यांनी दिपके यांना या कराराची माहिती दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कराराची प्रत फाडून त्यांनी आपला विरोध व्यक्त केला. दरम्यान, CJP कडून ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ या अभियानाची घोषणाही करण्यात आली आहे. १७ सप्टेंबरपासून गडचिरोली येथून या अभियानाला सुरुवात होणार आहे.
या वादाची पार्श्वभूमी अशी की, ‘आदिवासी अधिकार बचाव कृती समिती’ने याच महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील सुमारे ४९० आदिवासी वसतिगृहांचे कामकाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित ट्रस्टकडे सोपवल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे आदिवासी वसतिगृहांच्या व्यवस्थापनाचा मुद्दा चर्चेत आला आहे असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
मात्र, आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. वसतिगृहांचे व्यवस्थापन ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आलेले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुमारे वर्षभरापूर्वी ट्रस्टसोबत सामंजस्य करार करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागातील शाळा आणि शैक्षणिक सुविधांची पाहणी केली जाणार आहे. गडचिरोलीनंतर हे अभियान नंदुरबार, नाशिकसह इतर आदिवासीबहुल भागांत नेण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे.


























































