
छत्तीसगडमध्ये वर्ष 2013मध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी जगदलपूर येथील विशेष एनआयए न्यायालयाने दहा दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या हल्ल्यात माजी पेंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्यासह काँग्रेसच्या 29 नेत्यांची हत्या करण्यात आली होती. गेल्या आठवडय़ात न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षेबाबत निर्णय राखून ठेवला होता. आज त्याबाबत निर्णय दिला.
जगदलपूर जिह्यातील झीरम घाटात नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. 25 मे 2013 रोजी हा भीषण हल्ला करण्यात आला. त्यात छत्तीसगडमध्ये विद्याचरण शुक्ल यांच्यासह नंदपुमार पटेल, महेंद्र कर्मा, दिनेश पटेल, उदय मुदलियार, योगेंद्र शर्मा यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हत्या करण्यात आली होती. या दिवशी काँग्रेसने सुकमा येथे परिवर्तन यात्रा काढली होती. त्यानंतर राज्यातील इतर भागातदेखील यात्रा काढण्यात येणार होती. नक्षलवाद्यांनी आयईडी स्पह्ट घडवून ताफा रोखला आणि दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. याप्रकरणी 13 वर्षे सुनावणी चालली.
2 महिला, 8 पुरुष नक्षलवाद्यांना शिक्षा
याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या 10 नक्षलवाद्यांमध्ये 2 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. प्रमिला मोडियम, चैतू लेकाम, सुमित्रा मोडियम, मुक्का मंडावी, कवासी कोसा, आयता मरकाम, मडकामी देवा, जोगा मडकम, बंजामी सन्ना, महादेव नाग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांची लगेच जगदलपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.


























































