डोपिंगच्या काळ्या कारनाम्यांना ‘नाडा’चा दणका, राकेश कुमारवर आजीवन बंदी; गौरव वत्स निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्राला हादरवणाऱया डोपिंग प्रकरणांवर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) कठोर कारवाई केली आहे. ऍथलेटिक्स प्रशिक्षक राकेश कुमार यांच्यावर प्रतिबंधित पदार्थ पुरवल्याप्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आली आहे, तर पॉवरलिफ्टर गौरव वत्स याला प्रतिबंधित औषधांचा साठा आणि तस्करीच्या आरोपांवरून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. नाडाने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या बंदी यादीत ही कारवाई करण्यात आली.

राकेश कुमार यांना गेल्या वर्षी मार्चमध्येच निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावरील आजीवन बंदी त्याच कालावधीपासून लागू मानली जाणार आहे. आंतरराज्यीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती धावपटू प्रकृती रूपा राव हिच्यावरही तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली आहे. प्रतिबंधित स्टेरॉइड स्टॅनोजोलोल आणि ड्रोस्टॅनोलोनसाठी ती दोषी आढळली.

खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर भारोत्तोलक चेल्सीवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. डोप चाचणीत अपयशी ठरल्याने ही कारवाई करण्यात आली. एका अल्पवयीन भारोत्तोलकाचाही तात्पुरते निलंबित खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.

ऍथलेटिक्समध्ये डोपिंगची काळी छाया

मध्यम पल्ल्याचा धावपटू कौशल कुमार, स्टीपलचेसपटू जुझार सिंह आणि लांब पल्ल्याची धावपटू बलजित कौर यांचाही निलंबित खेळाडूंमध्ये समावेश आहे. एकूण सात ऍथलिट्सवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाल्याने हिंदुस्थानी ऍथलेटिक्समधील डोपिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वत्सच्या कंपनीत प्रतिबंधित औषधांचा साठा

नाडाच्या गुप्तचर आणि तपास पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एप्रिलमध्ये विविध यंत्रणांनी नजफगढ येथील गौरव वत्सच्या पोषणपूरक कंपनीवर संयुक्त कारवाई केली. या कारवाईत मेथेनोलोन, स्टॅनोजोलोल आणि ट्रेंबोलोनसह अनेक प्रतिबंधित एनाबॉलिक स्टेरॉइड्स जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान सुमारे 2 हजार 800 कॅप्सूल आणि गोळ्या तसेच प्रतिबंधित पदार्थांची 11 इंजेक्शन युनिट्स जप्त करण्यात आली.