
प्रख्यात जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी ॲडिडासने हिंदुस्थानातील टेक्नॉलॉजी विभागातील काही पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुग्राममधील ॲडिडासच्या ‘इंडिया टेक हब’मध्ये 15 सप्टेंबरला झालेल्या टाउन हॉल बैठकीत कर्मचाऱ्यांना या पुनर्रचनेची माहिती देण्यात आली.
कंपनीने हिंदुस्थानातील टेक विभागातील नोकरकपातीला दुजोरा दिला आहे. मात्र, नेमक्या किती कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. ॲडिडासच्या म्हणण्यानुसार, या पुनर्रचनेचा परिणाम हिंदुस्थानातील टेक्नॉलॉजी विभागातील 20 टक्क्यांपेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर झाला आहे. कंपनीने बदलत्या व्यावसायिक गरजांनुसार आपली कार्यपद्धती अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
मात्र, या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम टेक हबमधील सुमारे 700 कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 350 किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम झाल्याचा दावा केला जात आहे. या आकडेवारीची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही आणि ॲडिडासनेही या संख्येला दुजोरा दिलेला नाही. नोकरकपात होणाऱ्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनिअर्स यांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बैठकीनंतर कर्मचाऱ्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आल्याचे समजते. काही कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी कंपनी सोडण्यासंदर्भातील पत्रे देण्यात आली. तर दुसऱ्या गटातील कर्मचाऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांना इतर टेक हबमधील सहकाऱ्यांकडे आपल्या कामाचा ताबा देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कंपनीमध्येच उपलब्ध असलेली दुसरी भूमिका किंवा पद शोधण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला आहे, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
15 डिसेंबरपर्यंत अंतर्गत पद मिळाले नाही, तर तो त्यांचा शेवटचा कामाचा दिवस असेल, अशी माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ॲडिडासने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, व्यवसायाच्या बदलत्या गरजांशी कार्यपद्धती सुसंगत करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. संस्थेची रचना सुलभ करणे, महत्त्वपूर्ण क्षमता बळकट करणे आणि कंपनीला दीर्घकालीन वाटचालीसाठी सज्ज करणे हा या पुनर्रचनेमागील उद्देश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.





























































