आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानची युवा ब्रिगेडवर भिस्त, 310 खेळाडू प्रथमच मैदानात उतरणार ;106 पदकांचा विक्रम मोडण्याचे लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकांसाठी हिंदुस्थानने तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही. जपानमधील आयची-नागोया येथे 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाडसाठी गेल्या तीन वर्षांत हिंदुस्थानी खेळाडूंच्या प्रशिक्षणावर, क्रीडा साहित्यावर तसेच प्रशिक्षक आणि तज्ञांच्या नियुक्तीवर तब्बल 702 कोटी 86 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेच्या निधीतून आणखी 97 कोटी 84 लाख रुपये खर्च झाले आहेत.

यंदाच्या हिंदुस्थानी पथकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तब्बल 310 खेळाडू प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत उतरणार असल्याने युवा ब्रिगेडवर देश्ची खरी भिस्त असेल. मागील हांगझोऊ आशियाई स्पर्धेमध्ये हिंदुस्थानने 106 पदकांची ऐतिहासिक कमाई केली होती. यंदा त्या कामगिरीची पुनरावृत्ती किंवा त्यापेक्षा सरस कामगिरी करण्यासाठी हिंदुस्थानी खेळाडू सज्ज असल्याचे टॉप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. जोहल यांनी सांगितले.

युवा चेहऱ्यांकडे लक्ष

आयची-नागोया आशियाई स्पर्धेत युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, टेबल टेनिसपटू सिंड्रेला दास, बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी आणि नुकतेच ज्युनियर विश्वविजेतेपद पटकावणारी 18 वर्षीय स्क्वॅशपटू अनाहत सिंह यांच्याकडून अपेक्षा आहेत. ज्यूदोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली हिंदुस्थानी अस्मिता डे हिच्याही कामगिरीकडे लक्ष असेल. जोहल यांच्या माहितीनुसार, जानेवारीपासून टार्गेट आशियाई क्रीडा गटाच्या नऊ समन्वय बैठका घेण्यात आल्या. विविध क्रीडा महासंघांशी संबंधित प्रशासकीय अडचणी असतानाही खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्यावर भर देण्यात आला. यंदाच्या पथकातील 65 खेळाडू ‘खेलो इंडिया’च्या पायाभूत व्यवस्थेतून पुढे आले आहेत.

आंतरराष्ट्रीय अनुभवासाठी 251 कोटी

खेळाडूंच्या तयारीसाठी वार्षिक स्पर्धा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत झालेल्या खर्चातील सर्वाधिक 251 कोटी 40 लाख रुपये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागासाठी, तर 118 कोटी 30 लाख रुपये देशांतर्गत प्रशिक्षणासाठी खर्च करण्यात आले. हिंदुस्थान यंदा 36 क्रीडा प्रकारांत 501 खेळाडूंचे पथक उतरवणार आहे. यात 267 पुरुष आणि 234 महिला खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंसोबत 265 सदस्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग असेल.

हांगझोऊमध्ये हिंदुस्थानने 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य अशी एकूण 106 पदके जिंकली होती. आता त्या विक्रमाला आणखी उंची देण्याचे आव्हान हिंदुस्थानी खेळाडूंसमोर आहे.