मुंबई-नाशिक महामार्गावर आटगावजवळ अपघात; त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-nashik-highway-fatal-accident-atgaon-five-of-same-family-returning-from-trimbakeshwar-killed-live

त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱया जोगेश्वरी येथील जयस्वाल कुटुंबावर आज काळाने घाला घातला. भरधाव असलेल्या एर्टिगा एसयूव्हीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ती नाशिक-मुंबई महामार्गावर आटगाव परिसरात उभ्या असलेल्या ट्रकच्या सांगाड्यावर धडकली. या अपघातात कारमधील दोन लहान मुलांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले.

जोगेश्वरी येथील जयस्वाल कुटुंबीय त्र्यंबकेश्वर येथून देवदर्शन करून एर्टिगा कारने जोगेश्वरीकडे निघाले होते. त्यांची कार आज दुपारी नाशिक-मुंबई महामार्गावरील आटगाव परिसरात आली असता कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला. कारचे स्टेअरिंग लॉक होऊन ब्रेक फेल झाले. त्यामुळे ही कार रस्त्याच्या बाजूला गेल्या चार वर्षांपासून बंद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकच्या सांगाड्यावर जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की कारमधील श्रीराम जयस्वाल (34), सुरज जयस्वाल (28), संतराम जयस्वाल (70), आयुष जयस्वाल (8) आणि अवंतिका जयस्वाल (11 महिने) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात राधिका जयस्वाल (30), अंशिका जयस्वाल (7), सुनीता जयस्वाल (38), शिवम जयस्वाल (14), सतीश जयस्वाल (24) आणि सुशी जयस्वाल (15) हे गंभीर जखमी झाले. त्यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने राधिका आणि अंशिका यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.

चार वर्षांपासून ट्रकचा सांगाडा तसाच पडून

महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकला चार वर्षांपूर्वी आग लागली होती. तेव्हापासून या जळालेल्या ट्रकचा सांगाडा महामार्गाच्या कडेला पडलेला आहे. हा सांगाडा वेळेत हटवला असता तर कदाचित हा जीवघेणा अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.