
मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वाको इंडिया वरिष्ठ व मास्टर्स तसेच प्रथम पॅरा राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई शहरातील किकबॉक्सिंगपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुंबई शहरचे प्रतिनिधित्व करणाऱया खेळाडूंनी सामान्य तसेच पॅरा गटात कौशल्य, शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विविध पदकांची कमाई केली.
मुंबईच्या विन्स पाटीलने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीन पदके पटकावली. अश्विनी जांबलेने सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदके मिळविली. हर्ष साळेकरने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तृष्णा नाईकने दोन कांस्यपदकांची कमाई केली, तर दर्शना आगवणेने कांस्यपदक पटकावले. प्राज्ञेश एम. पटवर्धन यांनी पॉइंट फाइट प्रकारात मुंबई शहराचे प्रतिनिधित्व केले.
पॅरा राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये मुंबईच्या पॅरा किकबॉक्सिंगपटूंनीही आपल्या जिद्दीची, चिकाटीची आणि क्रीडा कौशल्याची प्रभावी छाप पाडली. विनोद रावत, सुधाकर पाटील आणि हेमलताबेन मच्छी यांनी सुवर्णपदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. रोहित मोरे आणि मुरुगेश यांनी रौप्यपदके पटकावली, तर अमन थलारी यांनी कांस्यपदक मिळवून मुंबईच्या पदकतालिकेत भर घातली.
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश मुरकर तसेच आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक विघ्नेश मुरकर यांनी खेळाडूंच्या तयारीसाठी विशेष मेहनत घेतली. प्रशिक्षक आशिष महाडिक हेदेखील राष्ट्रीय संघासोबत उपस्थित होते. खेळाडूंच्या प्रशिक्षणाला आणि त्यांच्या क्रीडा प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्टने मोफत प्रशिक्षणासह आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. या सहकार्यामुळे विविध आर्थिक स्तरांतील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मुंबईच्या खेळाडूंनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाको इंडिया अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱयांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






























































