‘सैयारा’नंतर अनीत-अहानची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार; प्रेमासोबत अ‍ॅक्शनचाही तडका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

‘सैयारा’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अनीत पड्डा आणि अहान पांडेची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. ‘सैयारा’च्या तुफान यशानंतर या जोडीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. आता दिग्दर्शक मोहित सुरी यांनी या दोघांना पुन्हा एकत्र घेतलं असून, यावेळी त्यांची लव्हस्टोरी थोडी हटके असणार आहे. अनीत आणि अहान यांनी ‘सैयारा’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत दमदार यश मिळवलं. त्यामुळे या नव्या जोडीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आता त्याच जोडीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी मोहित सुरी यांनी केली आहे.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, मोहित सुरी यांचा हा आगामी चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. चित्रपटाच्या शूटिंगला ऑक्टोबरमध्ये मुंबईत सुरुवात होणार आहे. अंधेरी येथील यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये पहिलं शूटिंग शेड्यूल पार पडेल. यात अनीत आणि अहानच्या व्यक्तिरेखांची ओळख करून देणारी दृश्यं तसेच त्यांच्या घरातील काही प्रसंग चित्रित केले जाणार आहेत. यानंतर नोव्हेंबरमध्ये शूटिंग गोव्याला करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, हा केवळ टिपिकल रोमँटिक चित्रपट नसेल. प्रेम, नातं आणि भावनांसोबतच चित्रपटात अॅक्शनचाही तडका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘सैयारा’पेक्षा यावेळी अनीत-अहानची जोडी एका वेगळ्याच अंदाजात दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठी मोहित सुरी यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये अनीत आणि अहानच्या लुक टेस्टही घेतल्या आहेत. निर्माते अक्षय विधानी यांना हा चित्रपट नेहमीच्या रोमँटिक सिनेमांपेक्षा वेगळा असावा, अशी इच्छा असल्याचं म्हटलं जात आहे.