
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील २२ वर्षीय विवाहित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
महिलेने दोघांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलेचा पतीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने तिला नरेंद्र पवार यांच्या कार्यालयात बोलावण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी पवार आणि शैलेश पाटील यांनी तिला बापगाव येथील एका खासगी मालमत्तेवर नेल्याचा आरोप आहे.
सदर महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला असून, तक्रारीनुसार, रात्री सुमारे दोन वाजता नरेंद्र पवार तेथून निघून गेले. त्यानंतर शैलेश पाटील यानेही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने काँग्रेसच्या नगरसेविका आणि गटनेत्या कांचन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. १६ सप्टेंबर रोजी तिने कुलकर्णी यांना संपूर्ण प्रकार सांगितला. तसेच कथित घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि व्हॉट्सॲप चॅटही दाखवल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यानंतर कुलकर्णी यांनी महिलेला सोबत घेऊन पडघा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या सूचनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.


























































