सॅमसन-अभिषेकच्या झंझावाताचा अफगाणिस्तानला तडाखा; सलग दुसऱ्या विजयासह टी-20 मालिका जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजू सॅमसन-अभिषेक शर्मा आले आणि त्यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा अक्षरशः फडशाच पाडला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानच्या सलामीवीरांनी अशी आक्रमक सुरुवात केली की अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. पॉवरप्लेमध्येच 82 धावा कुटत हिंदुस्थानने सामन्याचा निकाल जवळपास निश्चित केला. विजयी लक्ष्य 31 चेंडू आणि 7 विकेट राखून गाठत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

आज संजूच्या फलंदाजीचे रौद्र रूप अफगाणी गोलंदाजांना पाहायला मिळाले. त्याने अवघ्या 22 चेंडूंत 57 धावांची वादळी खेळी केली. चौकार-षटकारांचा मारा करत त्याने अफगाण गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याला अभिषेक शर्माची तितकीच आक्रमक साथ मिळाली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची झंझावाती भागीदारी रचत अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरले. विशेष म्हणजे अखेरच्या 11 चेंडूंमध्ये हिंदुस्थानने तब्बल 37 धावा फटकावल्या. मोहम्मद नबीच्या एका षटकातच 27 धावा लुटत सॅमसन-अभिषेकने अफगाणिस्तानला चांगलेच धारेवर धरले.

तत्पूर्वी नितीशकुमार रेड्डीच्या तीन विकेटच्या भेदक माऱ्यामुळे अफगाणिस्तान 20 षटकांत 8 बाद 159 धावांवर थांबला होता. कर्णधार इब्राहिम झदरानने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. झदरानने सादिकुलाह अटलसह 51 धावांची भागी रचली, पण नितीश रेड्डीने झदरानला बाद केले, पुढे त्यांचा डाव धडपडत पुढे सरकला आणि त्यांची 6 बाद 100 अशी अवस्था झाली. मात्र त्यानंतर मोहम्मद नबी आणि राशीद खानने 48 धावांची भागी रचत अफगाणिस्तानला आव्हानात्मक मजल मारून दिली. त्याचमुळे ते 159 धावांपर्यंत पोहचू शकले. नितीशने 24 धावांत 3 तर अर्शदीपने 2 विकेट टिपत अफगाणी संघाला धक्के दिले.