
कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने परदेशी क्रमांकावरून दिल्लीतील एका 50 वर्षीय महिलेला खंडणीसाठी फोन आल्याने खळबळ उडाली. फोन करणाऱ्याने महिलेकडे 200 कोटी रुपयांची खंडणी मागितली, असे पोलिसांनी सांगितले. दिल्लीत आतापर्यंत मागितलेली ही सर्वात मोठी खंडणीची रक्कम असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार महिला सिव्हिल लाईन परिसरातील रहिवासी असून, तिला 7 सप्टेंबर रोजी रात्री 10.44 वाजता परदेशी क्रमांकावरून खंडणीसाठी फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख गोल्डी ब्रार अशी सांगितली. तसेच त्याच्याकडे तिच्याबद्दलची सर्व माहिती असल्याचे सांगत 200 कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्यास गंभीर परिणामांची धमकीही दिली.
महिलेने पहिला फोन दुर्लक्षित केला, परंतु तिला पुन्हा त्याच रकमेची मागणी करणारा आणि धमकी देणारा फोन आला. त्यानंतर तिने त्वरित पोलिसांना माहिती दिली. तक्रार मिळाल्यानंतर आणि प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी 10 सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला. मात्र, या प्रकरणातील तथ्ये अद्याप पडताळली जात आहेत. तसेच चौकशीदरम्यान तक्रारदाराने दोन वेगवेगळ्या रकमांचा उल्लेख केला होता. त्यामुळे कथितरित्या मागितलेल्या रकमेचीही खात्री केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
महिलेचे सासरे वारल्यानंतर त्यांच्या मालमत्तेवरून कौटुंबिक वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खंडणीच्या कथित फोनशी संबंधित परिस्थितीची तपासणी केली जात आहे. फोन करणाऱ्याची ओळख, त्यामागचा उद्देश आणि फोन करणाऱ्याचा ब्रारशी काही संबंध आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.
























































