
यजमान अमेरिकेच्या बेन शेल्टनचे स्वप्न धुळीस मिळवीत जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवने ‘यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम’ टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. साडेतीन तास रंगलेल्या अंतिम सामन्यात २९ वर्षीय ज्वेरेवने २३ वर्षीय शेल्टनचा ६-३, ७-६ (७-२), ५-७, ६-२ असा चार सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीतील दुसरे ‘ग्रॅण्डस्लॅम’ विजेतेपद पटकाविले.
पहिला सेट सहज जिंकत ज्वेरेवने सामन्याची दिशा स्पष्ट केली. मग दुसरा सेट टायब्रेकपर्यंत लांबला. त्यात ज्वेरेवनेच बाजी मारली; पण शेल्टनने तिसरा सेट ७-५ असा सेट जिंकला. मात्र, निर्णायक चौथ्या सेटमध्ये ज्वेरेवने आपला अनुभव पणाला लावत ६-२ अशी बाजी मारीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
जर्मन वादळासमोर अमेरिकन स्वप्न उद्ध्वस्त !
‘यूएस ओपन’च्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच पोहोचलेल्या शेल्टनला घरच्या चाहत्यांसमोर पहिल्या ‘ग्रॅण्डस्लॅम’चा मुकुट पटकाविण्याची संधी होती. उपांत्य फेरीत त्याने फ्रान्सिस टियाफोचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, ज्वेरेवसमोर त्याचा वेग आणि आक्रमकता अखेर निष्प्रभ ठरली. ज्वेरेवने या विजयासह यंदाच्या मोसमातील आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. एका मोसमात सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम सामने जिंकण्याचा जर्मनीचा महान टेनिसपटू बोरिस बेकरचा १९८९ सालचा विक्रम त्याने तब्बल ३६ वर्षांनी मोडीत काढला.
‘फ्रेंच ओपन ‘नंतर ‘यूएस ओपन ‘ही खिशात !
ज्वेरेवसाठी २०२६ हे वर्ष विक्रमी ठरले आहे. जूनमध्ये फ्लाव्हियो कोबोलीला नमवत त्याने ‘फ्रेंच ओपन’चे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळविले. त्यानंतर ‘विम्बल्डन’च्या अंतिम फेरीत त्याला यानिक सिनरकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्या पराभवाने ज्वेरेव खचला नाही. थेट न्यूयॉर्कमध्ये धडक देत त्याने ‘यूएस ओपन’च्या रूपाने दुसरा ग्रॅण्डस्लॅम मुकुटही पटकाविला. या विजयाबद्दल ज्वेरेवला ४० लाख पौंडांचे बक्षीस मिळाले.

























































