विज्ञान रंजन – कनवाळू गजराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

आज गणेश चतुर्थी, गणरायाच्या आगमनाचा दिवस. अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा होईल. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक आहे ‘गजानन’ किंवा ‘गजमुख’. हत्तीचे मुख असलेलं हे दैवत. हत्तीसारखा प्रचंड आकाराचा प्राणी भूमीवर सध्या नाही. पाण्यात ‘ब्लू व्हेल’ सर्वात मोठा म्हणजे अतिप्रचंड असतो. आपण त्याला देवमासा म्हणू शकतो, परंतु भूमीवरच्या वनकाननांमध्ये हत्तीला स्पर्धक नाही.

हा विशालदेही हत्ती मनाने किती समंजस आणि कनवाळू, कृपाळू असू शकतो याचं प्रत्यंतर नुकतंच नेपाळमध्ये आलेल्या आणि साऱया जगाला हेलावणाऱया, हादरवणाऱया महापुरात आलं. कोपलेला हिमालय, रोरावणाऱया हिमनदीसह समोर दिसेल ते उद्ध्वस्त करणारा महाजलप्रवाह होऊन धावू लागला. त्यात हजारो घरं नष्ट झाली. शेकडय़ांनी संसार मोडून पडले. माणसं गेली. कसाबसा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात काहींचं दैव मात्र बलवत्तर ठरलं. कुठे ढिगाऱयाखाली आठवडाभर अडकलेल्यांना वाचवणाऱयात सुरक्षा रक्षकांना यश आलं तेव्हा वाचलेल्यांचे आणि वाचवणाऱयांचे डोळेही पाण्याने डबडबले. हा माणुसकीचा महापूर होता.

त्यातच एक हृद्य व्हिडीओ आला. चार-पाच वर्षांची दोन मुलं उसळत्या प्रवाहात गटांगळ्या खात होती. जिवाच्या आकांताने जगण्याची धडपड करत होती आणि त्यांचे हताश नातेवाईक काठावरून ते काळीज कापणारं दृष्य पाहत होते. तेवढय़ात ‘चमत्कार’ घडला. त्याच पाण्यातून मार्ग काढणारा एक विशालदेही गजराज वेगाने त्या मुलांजवळ आला. त्याने मदतीसाठी सोंड पुढे केली आणि ती मुलं आईला बिलगावी तशी त्या सोंडेला बिलगली. हत्तीने अत्यंत कौशल्याने त्यांना ‘कवेत’ घेतलं आणि काठावरच्या त्यांच्या घरच्या माणसांकडे सुखरूप पोचवलं. हा व्हिडीओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना ही गजकृपा कधीच विसरता येणार नाही. मग ज्यांनी तो व्याकूळ प्रसंग अनुभवला त्यांच्याविषयी काय सांगावं! त्यांना तर ते गजाननाचं वरदानच वाटलं असेल.

प्रसिद्ध चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांनी गणपती आणि हत्ती यांचं अप्रतिम संयुक्त चित्र साकारलं आहे. ते अद्वैतच आहे. गज म्हणजे हत्ती हा बुद्धिमान प्राणी आणि गजानन ही बुद्धीची देवता. हा संकेतही काव्यात्म हृद्य वाटतो. म्हणूनच आजच्या लेखात हत्तीसारख्या महाकाय आणि बुद्धिमान प्राण्याविषयीचं थोडं विज्ञान आणि रंजन.

हत्ती पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात विषुववृत्तीय जंगलाच्या आसपास आणि उष्ण समशीतोष्ण कटिबंधीय देशात दिसतात. आफ्रिका आणि आशियातील त्यांची वस्ती मोठी. हिंदुस्थानच्या दक्षिण भागापासून ते आसामच्या अरण्यापर्यंत हत्तींच्या वसाहती आढळतील. हत्ती कळपाने राहतात. परस्परांना सांभाळून घेतात. हत्ती या विषयावर सर्व भाषांमध्ये अनेक पुस्तकं आहेत. त्यात हत्तींची गमतीची माहिती मिळते. ‘गुगल’वरही मिळेल. त्यातली एक गोष्ट म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जेव्हा अतिविशालधारी डायनॉसॉरचं साम्राज्य पृथ्वीवर होतं तेव्हा हत्ती, घोडे या प्रजाती स्वतःचं रक्षण करण्याच्या हेतूने नैसर्गिकतेने लहान आकाराच्या होत्या. त्यावेळचे हत्ती फक्त तीन ते आठ किलो वजनाचे म्हणजे आताच्या बालहत्तींपेक्षाही चिमुकले होते.

पुढे पर्यावरणीय अनुकूलता निर्माण झाल्यावर त्यांची वाढ अफाट झाली. ध्रुवीय प्रदेशातले ‘मॅमथ’ प्रकारचे केसाळ हत्ती तर अतिप्रचंड आकाराचे होते असं म्हणतात, पण आपण पाहतो ते हत्तीसुद्धा दोन-अडीच टन वजनाचे असतात. त्यांची उंची सात ते अकरा फूट असते. काही त्यापेक्षा थोडे जास्त उंचही आढळतात. 1956 मध्ये झालेल्या पाहणीनुसार पृथ्वीवरचा आजपर्यंतचा सर्वात महाहत्ती किंवा गजराज जवळपास 14 फूट उंचीचा (13.8) होता! आफ्रिकेतल्या अंगोला येथील जंगलात दुर्दैवाने त्याची शिकार झाली.

हत्ती परस्परांशी संबंध ठेवणारी ‘भाषा’ वापरतात. ती कधी स्पर्शाची, हावभावांची किंवा विशिष्ट मंद तरंगाच्या ध्वनीची असते. इतर प्राण्यांपेक्षा हत्तींमधलं कव्होल्युटेड निओकॉर्टेक्स म्हणजे मेंदूचा चुणीदार थर अधिक सक्षम, मोठा असतो. त्यामुळे त्यांच्या जाणिवा प्रगल्भ होतात. ते स्वतःबद्दल, कळपाविषयी सतत सजग असतात. एखाद्या हत्तीची अखेरची घटका भरली की, सारे त्याच्या भोवती गोळा होऊन भावना व्यक्त करतात. गेलेल्याच्या स्मरणार्थ काही दिवस त्या जागी येत राहतात. यातून त्यांचा एक सजीव म्हणून असलेला कनवाळूपणा सिद्ध होतो. ‘गज’ या संस्कृत शब्दाची फोड गज् म्हणजे ध्वनी (करणे) किंवा मध्ययुगात त्याच्या आकारावरून निर्माण झाला असावा अशा नोंदी आढळतात.

हत्तीचा प्रभाव जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये दिसतो. जपानमध्ये हत्ती बाहेरून आणले आहेत. त्यांना या दुर्मिळ प्राण्याचं किती आकर्षण असतं ते एका जपानी मुलाची भेट झाली तेव्हा लक्षात आलं. हत्तीच्या अनेक प्राचीन कथा आहेत. गजेंद्रमोक्षाच्या कथेत हत्तीला मगरीच्या जबडय़ातून वाचवल्याची कहाणी समजते. नेपाळच्या महापुरात मात्र गजराजाने दोन जिवांची केलेली सुटका त्यांच्या सुज्ञपणाचं दर्शन घडवते. हत्ती जेवढा विशालदेही तेवढाच तो विशाल मनाचाही असल्याचं जाणवतं. अर्थात त्याला कोणी डिवचलं तर 60 हजार स्नायू असलेली त्याची सोंड नऊ हजार टन लाकडं वाहून नेण्याइतकी सामर्थ्यवान असते हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं!