
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा ताफा आज मुंबईतील भीषण वाहतूक कोंडीत अडकला. परिणामी नियोजित कार्यक्रमाला पोहोचण्यास त्यांना एक तास उशीर झाला. त्यावर त्यांनी कार्यक्रमातच जाहीर कबुली देताना ही माझ्याच जुन्या चुकांची शिक्षा भोगतोय अशी उपरती गडकरी यांना झाली.
वरळी येथून ‘इंडो-अमेरिकन काॅर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्ड्स’ सोहळ्याला पोहोचण्यास गडकरी यांना उशीर झाला. या कार्यक्रमात त्यांनी मिश्कीलपणे तो किस्सा सांगितला. 1995 ते 2000 या काळात राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आपल्याला मुंबईत 55 उड्डाणपूल, वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्याची संधी मिळाली, पण त्या काळात आजचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. जुन्या तंत्रज्ञानावर आधारित हे पूल आता अपुरे पडत आहेत, असे गडकरी म्हणाले.
बहुमजली उड्डाणपूल उभारणार
शहरी भागांमधील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी नितीन गडकरी यांनी बहुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला प्रकल्प पुण्यात होणार असून त्यासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच खांबावर बहुमजली उड्डाणपूल उभारता येतील, ज्यावरील सर्वात वरच्या मजल्यावरून मेट्रो धावू शकेल, असे गडकरी यांनी सांगितले.

























































