
लाखो भाविकांचा लाडका बाप्पा उद्या सोमवारी विराजमान होत असल्यामुळे मुंबईसह राज्यात भक्तीचा महापूरच येणार आहे. बाप्पाच्या आवडत्या लाडू-मोदकासह गोडधोडाच्या प्रसादाचा सुगंध, भजन-आरती-कीर्तनाचे मंगलमय सूर; धूप-कापूर, अगरबत्ती आणि दुर्वा-फुलांच्या मनमोहक दरवळाने महाराष्ट्राच्या महाउत्सवास सुरुवात होणार आहे. यातच गणरायाच्या आशीर्वादाने राज्यात गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचेही जोशात आगमन झाल्याने चहूकडे आनंदीआनंद पसरला आहे.
भक्ती, उत्साह आणि सांस्पृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारा गणेशोत्सव उद्या 14 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मुंबईसह राज्यातील मोठय़ा मंडळांच्या बाप्पांचे मोठय़ा दणक्यात आगमन याआधीच झाले आहे. तर घरगुती गणेशोत्सवासाठीदेखील भाविकांनी आदल्या दिवशीच बाप्पांना आणले आहे.
गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गृहनिर्माण सोसायटय़ा, सामाजिक संघटनांनी अनेक सांस्पृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामध्ये पारंपरिक संगीत भजन, कीर्तन, भारूड, मनोरंजनाचे कार्यक्रम, आरोग्य शिबिरासह समाज प्रबोधन करणारे आणि ऐतिहासिक महत्त्व सांगणारे देखावे तयार करण्यात आले आहेत.
चार पादचारी पूल बंद
ऐन गणेशोत्सवात माटुंगा आणि मशीद बंदर स्थानकादरम्यानचे चार पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. मुंबई ‘आयआयटी’ने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिल्यामुळे पालिकेच्या सूचनेनुसार रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये मशीद बंदर येथील भंडारी पादचारी पूल, मशीद बंदर स्थानक पादचारी पूल, भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल आणि गुरुनानक हायस्पूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल बंद ठेवण्यात येणार आहेत.

























































