अ‍ॅव्हेंजर्स पुन्हा बॉक्स ऑफिसवर! ‘एंडगेम’च्या री-रिलीजला तुफान प्रतिसाद; ‘दृश्यम 3’ समोर आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्व्हलच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. जगभरामध्ये लोकप्रिय ठरलेला ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ हा चित्रपट परत एकदा चित्रपटगृहांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ या नावाने होणाऱ्या या पुनर्प्रदर्शनाला हिंदुस्थानातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या घडीला या चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमधूनच जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा चित्रपट येत्या 25 सप्टेंबरपासून हिंदुस्थानातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यावेळी प्रेक्षकांना केवळ जुना अनुभव पुन्हा घेता येणार नाही, तर चित्रपटात काही नवीन बोनस कंटेंटही पाहायला मिळणार आहे. आगामी ‘अ‍ॅव्हेंजर्स: डूम्सडे’शी संबंधित विशेष फुटेज आणि नवीन पोस्ट-क्रेडिट सीन या री-रिलीजचे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, बुकमायशो वर ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ची 7 हजार 300 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. तसेच 1.55 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी या चित्रपटात रस दाखवला आहे. हिंदुस्थानात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे देशभरातील मार्व्हल चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा ‘एंडगेम’ची क्रेझ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, हिंदुस्थानात पहिल्याच दिवशी 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ने जगभरात बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवले होते. थानोसविरोधातील अ‍ॅव्हेंजर्सची अंतिम लढाई, कॅप्टन अमेरिकाचा ‘अ‍ॅव्हेंजर्स असेंबल’ क्षण आणि भावनिक क्लायमॅक्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे सात वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता कायम असल्याचे दिसते.

‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’च्या री-रिलीजचा सर्वाधिक परिणाम 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’वर होईल का, याकडे आता लक्ष लागले आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा मोठा चाहतावर्ग असल्याने दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र ‘एंडगेम एन्कोर’ला मिळणारा प्रतिसाद आणि ‘डूम्सडे’च्या नव्या फुटेजची उत्सुकता पाहता मार्व्हलचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवू शकतो. त्यामुळे ‘दृश्यम 3’ आणि ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ यांच्यातील बॉक्स ऑफिसची ही अप्रत्यक्ष टक्कर पाहणे निश्चितच रंजक ठरणार आहे.