
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याच्या २५ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने दहशतवादी संघटना अल-कायदाने एक नवा व्हिडीओ जारी करून खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि त्याचा संभाव्य उत्तराधिकारी हमजा बिन लादेन दिसत आहे. सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्येच अमेरिकेने हमजाला एका दहशतवादविरोधी कारवाईत ठार केल्याचे जाहीर केले होते. मात्र तो पुन्हा एकदा या फुटेजमध्ये दिसल्याने अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आहे.
अल-कायदाची अधिकृत मीडिया विंग अस-सहबने ५० मिनिटांचा हा व्हिडीओ जारी केला असून, त्याचे शीर्षक ‘ए क्वार्टर सेंच्युरी ऑफ द ११ सप्टेंबर रेड्स’ असे ठेवण्यात आले आहे. या फुटेजमध्ये हमजा एका मोडकळीस आलेल्या मातीच्या भिंतीला टेकून बसलेला दिसत आहे. त्याने पांढरी पगडी घातली असून त्याच्या बाजूला एक असॉल्ट रायफल ठेवलेली आहे. या संपूर्ण व्हिडीओत हमजा अनेक वेळा दिसतो. याशिवाय २०२२ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला अल-कायदाचा माजी प्रमुख अयमान अल-जवाहिरी याचेही काही न पाहिलेले फोटो यात दाखवण्यात आले आहेत.
२०१९ मध्ये अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर अमेरिकेने केलेल्या कारवाईत हमजा मारला गेल्याचा दावा व्हाईट हाऊसने केला होता. मात्र अल-कायदाने त्याची मृत्यूची अधिकृत घोषणा किंवा शोकसंदेश कधीच जारी केला नाही. आता लादेन कुटुंबाच्या नावाचा वापर करून संघटनेमध्ये नवीन तरुणांची भरती करण्यासाठी आणि विद्यमान प्रमुख सैफ अल-अदेल याच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी अल-कायदाने ही जुनी फुटेज वापरण्याची खेळी केल्याचे अनेक गुप्तचर विश्लेषकांचे म्हणणे आहे.



























































