
>> सुभाषचंद्र सुराणा
भारतात अनेक सण, उत्सव मोठय़ा उत्साहाने भक्तिभावाने दरवर्षी साजरे होत असतात. कारण मुळातच आपली भारतभूमी उत्सवप्रिय भूमी आहे. भारतात अनेक धार्मिक पंथ आपापल्या रूढी रिवाजाने, पारंपरिक पद्धतीने, धर्म आचरणाने आपापले सण साजरे करीत असतात. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात फक्त एक-दोन टक्के लोकसंख्या असलेल्या, अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळालेल्या जैन श्वेतांबर धर्मीयांचे पर्युषण पर्व यंदा 8 सप्टेंबर व 15 सप्टेंबर 2026 पर्यंत मोठय़ा भक्तिभावाने साजरे केले जात आहे.
जैन धर्मीयांच्या श्वेतांवर मंदिरमार्गी, स्थानकवासी, तेरापंर्थी, समाज यामध्ये हे आठ दिवसांचा पर्युषण पर्व असते. तसेच दिगंबर जैन बांधव हा सण दहा दिवस साजरा करीत असल्याने तो दशलक्षणीय पर्युषण पर्व म्हणून साजरा केला जातो. दिगंबर बांधव पर्युषण पर्व गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत पारंपरिक रितीरिवाजाने साजरे करीत असतात.
पर्युषण पर्वाचा म्हणजेच अखेरचा महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे जैन संवत्सरी. या दिवशी सर्व जैन बांधव आपल्या धार्मिक स्थळांमध्ये संवत्सरी प्रतिक्रमण करून 84 लक्ष (लाख) प्राणिमात्रांची क्षमायाचना करुन आत्मशुद्धीने प्रार्थना करतात. गेल्या वर्षापासून आजतागायत झालेल्या कळत-नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित म्हणून सर्व प्राणीमात्रांची, सर्व समाजबांधवांची तसेच सर्व धर्मीयांची ‘मिच्छामि दुक्कड़म’ म्हणून क्षमायाचना करून संवत्सरी पर्व साजरे करतात.
जैन धर्माच्या इतिहासानुसार त्यांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषिभदेव (आदिनाथ भगवान) ते 24 वे तीर्थकर म. महावीर या सर्व तीर्थकरांनी जैन धर्माची मुलभूत तत्वे आगम या धर्मग्रंथानुसार दृढ व मजबूत केली. या धर्म संहितेनुसार या पर्युषण पर्वच्या कालावधीत देशभरातील सर्व जैनियांची मंदिरे उपाश्रय जैनस्थानक या धर्म केंद्रातून वास्तव्यात असलेले जैन मुनी गुरूमहाराज, आचार्य जुनी स्वामींजी /मा. सा. इत्यादीद्वारे अगमग्रंथातील धर्मत्वे, कल्पसूत्राचे वाचन या पर्वमध्ये जैनश्रावक श्राविकाच्यासाठी गुरुउपदेश गुरुसंदेश मार्गदर्शक व प्रेरणादायी होत असल्याने लाखो श्राविक वर्ग भक्तीने तल्लीन होऊन जातात.
भगवान महावीर यांनी सर्व मानवजातींच्या आत्मशांती व आत्मकल्याणासाठी समता आणि शांता संदेश सर्व जगाला दिला. त्यांनी अनेकांतवाद सत्य, अहिंसा आणि अपरीग्रह या तत्त्वाचा प्रसार केला. त्यांचीही शिकवण जैन धर्मग्रंथ 45 चे आगम धर्मग्रंथ याद्वारे केली आहे. जैन धर्माची दीक्षा इत्यादीबाबतचे पूर्ण विश्लेषण त्यांचे शिष्य गौतम स्वामी व भद्रबाहू व सुधर्म यांनी केले आहे, हीच जैन धर्माची शिक्षा व दीक्षा आचरण म्हणून आजपर्यंत पाळली जात आहे. या पर्युषण पर्वाच्या वेळी श्रावक व श्राविका तप-जप व उपवास साधनाद्वारे आत्मचिंतन करून आत्मसंतीच्या मार्ग प्रणालीकडे झुकतो.
ज्ञान व चरित्र या दोन्हींच्या उपासनेद्वारे कर्माचा क्षय करून मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग दाखविण्याचे, आत्मकल्याणाचे कार्य पर्युषण पर्वाद्वारे होते. आत्मकल्याण व आत्मशांतीची प्रेरणा पर्युषण पर्वामुळे जैन बांधवांना प्राप्त होते. पर्युषण पर्वाची आराधना करण्यासाठी म. महावीरांनी समता, क्षमा आणि संयम या तीन सूत्राद्वारे आत्मकल्याण करण्याचा मार्ग दाखविला आहे.
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधुनी पाहे’ असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. भगवान महावीर यांच्यासारख्या 24 तीर्थकर भगवानांनी स्वतःच्या आत्मशुद्धीने, तपोबलाने तसेच समता, क्षमा व संयमी जीवनाने माणसाला आत्मबलाच्या जोरावर सुखी जीवनाचा मार्ग दाखविला आहे. आत्मकल्याण, अहिंसा व चरित्र हे जैन धर्माचा प्राण आहेत तर पर्युषण पर्व हा जैन धर्माचा आत्मा आहे. आत्मशुद्धीद्वारे मोक्षप्राप्ती होते हीच पर्युषण पर्वाची शिकवण आहे. आत्मकल्याणाचा मार्ग हा पर्युषण पर्वाचे मौलिक महत्त्व आहे.






























































