
शफाली वर्माच्या 40 चेंडूंतील 64 धावांच्या झंझावाताच्या जोरावर उभारलेले 6 बाद 149 धावांचे आव्हान बांगलादेशला पेलवलेच नाही आणि त्यांचा संघ 109 धावांपर्यंतच मजल मारु शकला. हिंदुस्थानी महिला संघाने 40 धावांनी सहज विजय मिळवत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याचा अनोखा पराक्रमही रचला. गेल्या स्पर्धेतही हिंदुस्थानने बांगलादेशचाच धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली होती. आता हिंदुस्थानची जेतेपदाची झुंज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील विजयी संघाशी होईल.
हिंदुस्थानच्या महिला संघाने आपल्या धडाकेबाज विजयांची मालिका उपांत्य फेरीतही कायम राखली. साखळीत तिन्ही सामन्यांत दिमाखदार विजयाची नोंद करणाऱ्या हिंदुस्थानला उपांत्य फेरीतही बांगलादेश आव्हान देऊ शकला नाही. हिंदुस्थानच्या 150 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशी सलामी जोडीला हिंदुस्थानी गोलंदाजांना फटके मारताच आले नाही. त्यांच्या धावांचा वेग पाहून त्यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये सामना हिंदुस्थानला बहाल केला होता. पुढेही बांगलादेशी धावसंख्येला वेग लाभू न शकल्यामुळे हिंदुस्थानचा विजय 15 षटकांतच निश्चित झाला होता.
शफालीची षटकारबाजी
स्मृती मानधना अवघ्या 2 धावांवर बाद झाल्यानंतर शफाली वर्माने 3 षटकार आणि 7 चौकारांची बरसात करत 64 धावा पह्डून काढत संघाला 14 व्या षटकात शंभरीकडे नेले. त्यानंतर हरमनप्रीत कौर, रिचा घोष यांनी फटकेबाजी करत हिंदुस्थानला 6 बाद 149 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. दोघींनीही प्रत्येकी दोन-दोन षटकार खेचले.

























































