
गेल्या महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस उद्या 11 सप्टेंबरपासून परतणार असून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे या वर्षी पर्जन्यमानावर परिणाम होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील 36 पैकी 19 जिह्यांमध्ये पावसाची तूट असून 13 जिह्यांत सरासरी तर केवळ चार जिह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी दिली. उद्यापासून मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, जळगाव, घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि यवतमाळसह अनेक भागांत पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे शुक्रवारसाठी नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली भागांसाठी सावधगिरीचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यावेळी ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा मात्र कोरडाच राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




























































