
‘लष्कर–ए–तोयबा’शी संबंधित ‘युनायटेड लिबरेशन काऊंसिल’ या दहशतवादी संघटनेने कश्मिरी पंडितांच्या नावाने पुन्हा एकदा धमकीचे पत्र जारी केले आहे. गेल्या महिनाभरातील हे सहावे पत्र असून पंतप्रधान पॅकेजअंतर्गत कश्मीरमध्ये काम करणाऱ्या कश्मिरी पंडितांना त्यातून लक्ष्य करण्यात आले आहे. या पत्रामुळे 6 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धमकीचे पत्र आणि पोस्टर्स सोशल मीडिया तसेच कर्मचारी राहत असलेल्या परिसरातील घरांच्या भिंतींवर चिकटवण्यात आले आहेत. दहशतवाद्यांनी या कर्मचाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता आणि वाहनांचा तपशिलदेखील मिळविला आहे. बिगर स्थानिक कर्मचाऱ्यांचे मृतदेह घरी पाठवण्यात येतील, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. त्यानंतर कश्मिरी पंडितांच्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना तपास करून सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. भीतीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जाणे बंद केले आहे.
24 तास सुरक्षेचे कवच
जम्मू-कश्मीरमध्ये सुमारे 6 हजार कश्मिरी पंडितांना 2008च्या पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी आणि निवासस्थान देण्यात आले आहे. बडगाम, कुलगाम, बारामुल्ला, कुपवाड या भागात उभारण्यात आलेल्या विशेष वसाहतीत ते राहतात. ही कुटुंबे दहशतीत जगत आहेत. या ठिकाणी 24 तास कडक पहारा आहे. धमक्यांची पत्रे मिळाल्यानंतर अगदी लहान कामासाठीदेखील बाहेर जायचे असल्यास जवानांना माहिती द्यावी लागते.


























































