संघाबाहेर राहिल्यावर शांत राहायला शिकलो, ईशान किशनने विजयानंतरही सल बोलून दाखवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वाखालील पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफी 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण विभागाविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिला, परंतु पहिल्या डावातील मोठय़ा आघाडीच्या आधारावर  पूर्व विभागाला विजेता घोषित करण्यात आले. आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि नेतृत्वासाठी ईशान किशनला ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले. विजेतेपद जिंकल्यानंतर किशनने हिंदुस्थानी संघापासून दूर घालवलेल्या काळाबद्दल आणि त्याच्यात झालेल्या बदलांबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. .

किशन सामना संपल्यावर म्हणाला की, ‘संघापासून दूर राहिल्यानंतर शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी अधिक शांत राहायला शिकलो. मी स्वतःला खेळात पूर्णपणे झोपून द्यायला, त्याचे महत्त्व समजून घ्यायला आणि परिस्थिती अचूकपणे ओळखायला शिकलो. माझ्या संघातील प्रत्येक खेळाडूला मदत करणे हे माझे ध्येय आहे, जेणेकरून त्यांना माझ्यासारख्या कठीण परिस्थितीतून किंवा मानसिक तणावातून जावे लागणार नाही. माझ्यासाठीही हा एक मोठा आणि सकारात्मक बदल आहे. आता माझ्या मनात शांती आहे, खेळाची अधिक चांगली समज आहे आणि संघाला जिंकण्यासाठी मदत करण्याची अधिक तीव्र इच्छा आहे.’

त्याच्या खेळकर आणि खोडकर स्वभावाबद्दल विचारले असता किशन हसून म्हणाला,  ‘हा खोडकरपणा मी 90 वर्षांचा होईपर्यंत 100 टक्के माझ्यासोबत राहील!’