सामना अग्रलेख – एका नटसम्राटाची लहर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची सर्वच सार्वजनिक संपत्ती आणि देशभरातील कामांचे ‘ठेके’ फक्त गुजरातच्याच लोकांना मिळवून दिले जात आहेत. हे चित्र भयावह आहे. देशाच्या आर्थिक नाड्या फक्त आपल्याच लोकांच्या हाती असाव्यात व इतरांनी त्यांच्या दारात याचकासारखे उभे राहावे ही मानसिकता मोदी-शहांची आहेच. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळादेखील गुजरातेत नेण्यामागे कलाप्रेम वगैरे नसून मोठी आर्थिक उलाढाल हाच त्यांचा हेतू आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला पाठीचा कणा नव्हताच. त्यामुळे याबाबत ते काही बोलतील ही शक्यता नाहीच. एका ‘नटसम्राटा’ला लहर आली म्हणून राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गुजरातला हलवणे योग्य आहे काय?

पंतप्रधान मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरात राज्याचे? हा प्रश्न पडावा असे त्यांचे वर्तन आहे. आपला प्रांत, आपले राज्य यावर प्रेम असायला हवे, पण अशा सर्व प्रांतांचा मिळून भारत देश बनला आहे. पण मोदी यांचा भारत फक्त गुजरातपुरता मर्यादित आहे, इतक्या संकुचित वृत्तीचे ते प्रदर्शन घडवीत आहेत. सर्व काही गुजरातला पळवायचे ही त्यांची विकृती राष्ट्रीय एकात्मतेच्या, संविधानाच्या विरोधात आहे. यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गेल्या सात दशकांपासून राजधानी दिल्लीत होत आहे. मोदी-शहा जोडगोळीने ही परंपरा मोडून 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातच्या एकता नगरला करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी-शहा यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतून गुजरातला हलवला. उद्या ते देशाची राजधानीही हलवतील. त्यामुळे या दोघांना तत्काळ दिल्लीतून हलवण्याचा निर्धार जनतेला अधिक मजबुतीने करावा लागेल. अनेक राष्ट्रीय सोहळे दिल्लीच्या विज्ञान भवनात होतात किंवा राष्ट्रपती भवनात होतात. मग ते पद्म पुरस्कार वितरण असेल, शौर्य पदकांचे वितरण राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किंवा खेल रत्न पुरस्कार वितरण असेल. असे सोहळे राष्ट्राच्या राजधानी शहरातच होणे योग्य ठरते. यानिमित्ताने देशभरातील पुरस्कार विजेते राजधानीत येतात. त्यांना आपल्या राजधानीचे दर्शन घडते. मात्र मोदी-शहा मंडळाने हे दिल्ली दर्शन बंद करून गुजरात दर्शन सुरू केले. त्यामागचा हेतू काय ते त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. किंबहुना या दोघांची ती सत्ताधारी म्हणून अंतिम इच्छा असू शकते व त्यासाठी हा आटापिटा सुरू असावा. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन स्थळ बदलायचेच होते तर मग भारतात इतर अनेक राज्ये आहेत, ज्यांना संगीत-चित्रपटाची मोठी परंपरा आहे, त्यांचा विचार करता आला असता. मुंबई तर भारताची सगळ्यात मोठी चित्रनगरी आहे. भारतीय

चित्रपटाचा जन्मच महाराष्ट्रात

दादासाहेब फाळके यांनी घडवला. त्यामुळे आयोजन बदलाचा पहिला मान महाराष्ट्राला मिळायला हवा होता. त्याशिवाय कोलकाता, पंजाबचादेखील विचार होऊ शकला असता. दक्षिणेतील चित्रपट उद्योग मोठा आहे व भारतीय चित्रपट उद्योगास झळाळी प्राप्त करून देण्यात दक्षिणेचा मोठा वाटा आहे, पण मोदी-शहांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हलवला तो स्वतःच्या गुजरातेत. निदान गंगाकिनारी, काशीला तरी हा कार्यक्रम करावा, पण तेही नाही. गुजरातेत लवकरच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या एकमेव कारणासाठी चित्रपट सोहळा गुजरातला नेला गेला. यामागचे आणखी एक कारण असू शकेल. गेल्या दहा-बारा वर्षांत भारतातील यच्चयावत नट मंडळींना मागे टाकेल असा उत्तम अभिनय ‘नरेंद्र कुमार’ म्हणजे मोदी करत आहेत. मोदींना अभिनयाचा पुरस्कार द्यावा अशी मागणी विरोधी पक्षही करतो. मोदी हसतात उत्तम आणि हुकमी रडतात. वेगवेगळ्या भूमिका करतात. चेहऱ्याची रंगरंगोटी करतात, कधी ढोल वाजवतात, कधी बासरी ओठास लावतात. कधी अयोध्येच्या राममंदिरातले व्रतधारी पुजारी होतात, कधी ते डरपोक-भेदरटपणाचा अभिनय करतात. कधी मुखवटा लावतात, कधी मास्तर होतात, कधी कृष्ण, कधी राम, कधी विष्णूचा अवतार बनतात, कधी भारतीय जवानाचा गणवेश चढवतात तर पुलवामा येथे भारतीय सैनिक मारले जात असताना जिम कार्बेट अभयारण्यातले शिकारी बनतात. इस्लामी राष्ट्रांत जाऊन निधर्मी बनतात, तर भारतात येऊन हिंदूंचे तारणहार म्हणून भूमिका वठवतात. त्या अर्थाने ते राजकीय भूमीवरील ‘नटसम्राट’ असल्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आपल्या गावी साजरा व्हावा व त्यानिमित्ताने आपल्या अभिनय पर्वाची सांगता व्हावी असे त्यांनी ठरवले असेल तर त्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा

दिल्लीतून गुजरातला

नेण्यामागचा मोदी-शहांचा इरादा नेक नाही. याआधी विविध राज्यांचे पंतप्रधान होऊन गेले, पण नरसिंह रावांनी, देवेगौडा यांनी किंवा अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी आपापल्या प्रांतात राष्ट्रीय पुरस्कार सोहळे हलवले नाहीत. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, लालबहादूर शास्त्री, व्ही. पी. सिंग हे ‘उत्तरे’तून आले म्हणून दिल्लीतील परंपरागत सोहळे अमेठी, रायबरेली, फुलपूर, ग्वाल्हेर येथे केले नाहीत, पण मोदी-शहांचे डोके गुजरातच्या बाहेर जात नाही. देशातील अनेक शहरांची लूट करून तेथील ‘माल’ व संस्था या दोघांनी गुजरातला हलवल्या. 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला गेला. त्या सामन्यावर हजारो कोटींचा सट्टा खेळवला गेला. 2024-25 चा फिल्मफेअर पुरस्कार सोहळाही अहमदाबादमध्येच केला. 2030 ची राष्ट्रकुल स्पर्धा आणि 2036 ची ऑलिम्पिक स्पर्धादेखील गुजरातलाच घेण्याचे या जोडगोळीने ठरवून टाकले. जणू भारत देशात गुजरात हाच एकमेव प्रांत आहे व बाकीचे प्रांत कुचकामी आहेत. देशाची सर्वच सार्वजनिक संपत्ती आणि देशभरातील कामांचे ‘ठेके’ फक्त गुजरातच्याच लोकांना मिळवून दिले जात आहेत. हे चित्र भयावह आहे. देशाच्या आर्थिक नाड्या फक्त आपल्याच लोकांच्या हाती असाव्यात व इतरांनी त्यांच्या दारात याचकासारखे उभे राहावे ही मानसिकता मोदी-शहांची आहेच. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळादेखील गुजरातेत नेण्यामागे कलाप्रेम वगैरे नसून मोठी आर्थिक उलाढाल हाच त्यांचा हेतू आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला पाठीचा कणा नव्हताच. त्यामुळे याबाबत ते काही बोलतील ही शक्यता नाहीच. एका ‘नटसम्राटा’ला लहर आली म्हणून राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गुजरातला हलवणे योग्य आहे काय?