
मित्रासोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाप आणि भावाने 22 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली. आरोपींनी तरुणीची हत्या करून अपघाती मृत्यूचा बनाव केला. मात्र पोलीस तपासात हा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सोफिया असे मयत तरुणीचे नाव असून ती हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचे काम करत होती.
तीन महिन्यांपूर्वी सोफियाचा मित्रासोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी तिच्या वडील आणि भावाने क्रूर कट रचला. वडील आणि भावाने सोफियाला एका निर्जन रस्त्यावर नेले. तेथे भावाने तिच्या डोक्यात हातोडा मारून तिला गंभीर जखमी केले. यानंतर घेलजीपुरा चौकाजवळ एका भरधाव वेगातील वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला मागून धडक दिली. या धडकेमुळे त्याच्या बहिणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो स्वतःही जखमी झाला, असा दावा तिच्या भावाने केला.
सोफियाला तातडीने सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. सुरवातीला हे प्रकरण हिट अँड रनचे वाटले. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी प्रकरणाचा सखोल तपास केला असता सर्व बनाव उघड झाला. यानंतर सोफियाच्या वडील आणि भावाला अटक करण्यात आली. दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

























































