
घराबाहेर होणाऱ्या गोंगाटाला आक्षेप घेतला म्हणून मणिपुरी संगीतकार चोंगथाम विक्रम सिंग यांची एका टोळक्याने हत्या केली आहे. रविवारी रात्री उशिरा दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 15 वर्षांच्या मुलासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीच्या किलोकरी गावातील घराबाहेर चोंगथाम यांना रात्री साडेअकराच्या सुमारास गोंधळाचा आवाज आला. गोंधळाने त्रस्त होऊन ते बाहेर आले असता घराजवळच्या धाब्यावर काही तरुण त्यांना गोंधळ घालताना दिसले. चोंगथाम यांनी त्यांना हटकले. त्यावरून वाद झाला आणि या तरुणांनी चोंगथाम यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यापासून सुटका करून घेत चोंगथाम घराकडे धावले असता या लोकांनी पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राहुल गांधींचा अमित शहांवर निशाणा
‘देशाच्या राजधानीत स्वतःच्या घराबाहेर एका पित्याची हत्या झाली. अशा अनेक घटनांमुळे ईशान्य भारतातील लोक घाबरले आहेत. आम्ही इथे सुरक्षित आहोत का, असा प्रश्न ते विचारत आहेत. ईशान्य भारतातील लोकांविरुद्ध होणारे हे अत्याचार रोखण्यासाठी शहांचे गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलीस काय करत आहेत, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून केला. या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.


























































