
अमरावती आणि वर्धा जिह्यात चार जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा मृत्यू ‘कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर’मुळे झाल्याचे कारण देण्यात येत असले तरी या वाघिणीला जेरबंद करताना तब्बल तीन बेशुद्धीकरणाचे डोस देण्यात आले. एवढेच नाही तर त्यासाठी दोन वेगळी औषधे वापरण्यात आली. या प्रकारामुळे वाघिणीचा मृत्यू डार्टच्या ओव्हर डोसमुळे झाला का? असा संशय व्यक्त होत आहे.
मृत्यूचे नेमके व अचूक कारण स्पष्ट होण्यासाठी वाघिणीच्या अवयवांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच वाघिणीला जेरबंद करताना ज्या डॉक्टरने डार्ट मारला, त्यांनी आजतागायत फिल्डवर वाघाला रेस्क्यू केले नसल्याचेही उघडकीस आले आहे.
डार्ट मारताना वेगवेगळ्या औषधांचा वापर
अमरावतीच्या परतवाडा येथील वनविभागाच्या चमूने ‘कॅटामिन-झायलाझिन’चे औषध बंदुकीत भरून वाघिणीला पहिला डार्ट मारला. त्याचा परिणाम न झाल्याने दुसरा डार्ट मारण्यात आला. या औषधांचे दोन डार्ट मारल्यानंतर तिच्या बेशुद्ध होण्याची वाट बघणे अपेक्षित होते. त्याचवेळी पुण्यातून आलेल्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या चमूने परिस्थितीचा कोणताही अभ्यास न करता तिसरा डार्ट मारला. यावेळी बेशुद्धीकरणासाठी ‘मेडिटोमाईन’ हे औषध वापरले.
























































