
वांद्रे पश्चिम येथील आयकॉनिक गेईटी-गॅलेक्सी थिएटर तात्पुरते बंद करण्यात आले आहे. परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे. थिएटरच्या भिंतीबाहेर 12 नोटिसा लावण्यात आल्या आहेत. यामध्ये शो बंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
गेईटी-गॅलेक्सी थिएटरमध्ये सोमवारी ‘हनुमान अंश’ दाखवला जात होता. पण केबल जळाल्याने शो सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी गोंधळ घालत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे पोस्टर फाडले तसेच थिएटरमधील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. अखेर परिस्थिती बिघडल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस तपासात थिएटरचा परवाना 2021-22 मध्येच संपल्याचे समोर आले. तेव्हापासून परवाना नूतनीकरण करण्यात आलेला नाही. यानंतर नियमांचे पालन न झाल्यामुळे थिएटर व्यवस्थापनाला परिसर बंद करण्याचे आणि शो थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. वांद्रे पोलिसांनी थिएटरचे मालक, व्यवस्थापक आणि सिनेमा चालवणाऱ्या कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
थिएटरमालकांनी केला इन्कार
थिएटरचे मालक आणि कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी परवाना नूतनीकरण न करण्याच्या दाव्यांचे खंडन केले आहे. त्यांनी तांत्रिक दुरुस्तीमुळे थिएटर बंद झाल्याचे सांगितले आहे. थिएटर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, थिएटरमधील काही केबल जळाल्या होत्या. त्या बदलण्यासाठी दक्षिण मुंबईतील लोहार चाळीतून नवीन केबल्स मागवण्यात आल्या आहेत. समस्या दूर होताच शो पुन्हा सुरू केले जातील.

























































