
नवनीत प्रकाशनचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक व शिवसेना संघटक डॉ. हेमराज शाह (84) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात अरविंद आणि उदय शाह ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
मूळचे कच्छचे असलेले हेमराज शाह हे महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात समरस झाले होते. मराठी आणि गुजराती समाजातील दुवा अशी त्यांची ओळख होती. बृहन्मुंबई गुजराती समाजचे ते संस्थापक अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. ‘कच्छ-शक्ती’ या वार्षिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेना आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे, यशवंत किल्लेदार आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हेमराज शाह यांचे अंत्यदर्शन घेतले.




























































