
तालुक्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, याप्रकरणी आज शिरोळ शहरातून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱयांना तहसील कार्यालयात प्रवेश न दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. यावेळी पोलीस आणि मोर्चेकऱयांमध्ये झटापट झाली. संतप्त मोर्चेकऱयांनी तहसील कार्यालयाचा लोखंडी ग्रीलचा दरवाजा आणि काचेचा दरवाजा तोडून थेट कार्यालयात प्रवेश केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिरोळ तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावात आता एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, या एमआयडीसीला ग्रामस्थ आणि सैनिकांचा तीक्र विरोध आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधा देण्याऐवजी एमआयडीसीच्या माध्यमातून गावची जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच भूमिकेतून आज शिरोळ शहरातून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा तहसील कार्यालयाच्या दारात पोहोचल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱयांना रोखण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालयाचे बाहेरील गेट बंद करण्यात आले. त्यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली. संतप्त मोर्चेकऱ्यांनी लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडून तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर मुख्य इमारतीच्या काचेच्या दरवाजाजवळही मोर्चेकऱयांना रोखण्यात आले. मात्र, संतप्त मोर्चेकऱयांनी काचेचा दरवाजाही तोडून थेट तहसील कार्यालयात प्रवेश केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. सैनिक टाकळी गावच्या हद्दीतील रिकाम्या जागेत एमआयडीसी आणण्याचा घाट यड्रावकर यांनीच घातल्याचा आरोप मोर्चेकऱयांनी केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देण्याऐवजी गावात एमआयडीसी उभारून काय साध्य होणार, असा सवालही आंदोलकांनी केला.
अखेर तहसीलदार आंदोलकांना भेटले
तहसील कार्यालयात प्रवेश केल्यानंतरही सक्षम अधिकाऱयांनी आंदोलकांची भेट घेतली नसल्याने संताप आणखी वाढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण तहसील परिसर दणाणून सोडला. सैनिक टाकळीतील प्रस्तावित एमआयडीसी रद्द होत नाही आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. अखेर दुपारी 4 वाजता शिरोळचे तहसीलदार अनिल होळकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.


























































