
भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कलंडल्याची घटना ताजी असतानाच आज कुर्ला येथे देखील गणपती मूर्ती कलंडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. यानंतर गणेशोत्सव मंडळाने तत्काळ गणेशाची मूर्ती उचलून मूर्तीचे शीतल तलावात विसर्जन केले.
धारावी येथील प्रेम नगरातील ओम शक्ती फाऊंडेशनची 15 फूट गणरायाची मूर्ती बैल बाजार येथून घेऊन निघाले होते. शीतल तलाव येथे असलेल्या गतिरोधकामुळे ट्रॉलीचे संतुलन बिघडले परिणामी ट्रॉलीवरील गणरायाची मूर्ती खाली कोसळली. कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत मूर्ती उचलून तिचे शीतल तलावात विसर्जन केले. मंगळवारी सायंकाळी 9.45 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत संतोष जैस्वाल (28) आणि रोहित जैस्वाल (25) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर कुर्ला भाभा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.




























































