
रुग्णालयात घुसून डॉक्टरांना बेदम मारहाण करणाऱ्या शिंदे गटाच्या नगरसेवक रमेश म्हात्रेविरोधातील खटल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गती मिळणार आहे. डोंबिवली येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या मारहाणीच्या गुन्ह्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या कायदा व न्याय विभागाने अॅड. साळसिंगीकर यांच्या नियुक्तीबाबत अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रातील डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. रमेश म्हात्रेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने संतप्त टिप्पणी केली. डॉक्टरांना त्यांच्या कक्षात घुसून मारहाण करणाऱ्या लोकांना मोकाट फिरू देऊ नये, असे न्यायालयाने म्हटले. याचदरम्यान रमेश म्हात्रेविरोधात कल्याण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांत पोलिसांची बाजू मांडण्यासाठी अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




























































