
अभिनेत्री नोरा फतेहीच्या विरोधामध्ये ड्युन्स एव्हिएशन या चार्टर्ड विमान कंपनीने गंभीर आरोप करत, 3 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. नोराने चार्टर्ड विमानाबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे कंपनीकडून हा दावा ठोकण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नोराने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कथित अपमानास्पद तसेच बेजबाबदार भाषेचा वापर केला. त्यामुळेच आता या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 25 सप्टेंबरला गांधीनगर येथील न्यायालयात होणार आहे.
गेल्या वर्षी नोराने डिसेंबरमध्ये मुंबई ते जयपूर या प्रवासादरम्यान सेसना सायटेशन CJ2 या चार्टर्ड विमानातून प्रवास केला होता. दरम्यान तिने यावेळी काही व्हिडीओ काढले होते. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने हे विमान खेळण्यातले विमान आहे तसेच खूप लहान विमान आहे. असे व्हिडीओत म्हटले होते. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला होता. त्यानंतर कंपनीने या प्रकरणाची दखल घेत म्हटले की, नोराचे सोशल मीडियावर असलेल्या फाॅलोअर्सची संख्या पाहता, तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे विमान कंपनीच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. कंपनीच्या बुकिंगमध्ये तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी घट झाली. त्यामुळेच बुकिंग रद्द होण्याचे प्रमाणही वाढले. या सर्वांचा परिणाम कंपनीच्या आर्थिक बाबींवर झाला असून, कंपनीच्या प्रतिष्ठेवरही याचा परीणाम झाला आहे असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
कंपनीने यावर एप्रिल महिन्यात याचिका दाखल करत नोराची वक्तव्ये ही बेजबाबदार तसेच अविचारी असल्याचे म्हटले आहे. तसेच कोणताही पुरावा नसताना तिने केलेली ही वक्तव्ये केली आहे असा आरोप कंपनीने केला आहे. विमानाबाबतच्या सुरक्षेच्या मुद्द्यासंदर्भातील सर्व आरोप हे ड्युन्स एव्हिएशन यांनी फेटाळले आहेत. तसेच ‘सेसना सायटेशन CJ2’ हे चार्टर्ड विमान DGCA प्रमाणित असल्याचे म्हटले आहे. कंपनीने नोरावर 3 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला असून, नोराने सोशल मीडियावरून कंपनीसंदर्भात लिहीलेला मानहानीकारक मजकूर हटवावा अशी मागणी केली आहे. तसेच नोराकडून स्पष्टीकरणही देण्यात यावे असे कंपनीने न्यायालयाकडे मागणी केली आहे. दरम्यान या विषयावर नोराकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
३ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त, नोराने विमानाबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्ट आणि मजकूर सोशल मीडियावरून हटवावा, तसेच अभिनेत्रीने सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही कंपनीने न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणातील नोराची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.























































