
एअर इंडिया एक्सप्रेसच्या अबुधाबीला जाणाऱ्या विमानात उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. हे विमान जवळपास 36 हजार फूट उंचीवर असताना विमानातील इंजिन 1 मधील इंधनाची पातळी वेगाने कमी झाली. इतकेच नाही तर तेलाची पातळी रेड झोनमध्ये पोहचल्याने वैमानिकाला इंजिन-1 बंद करावे लागले आणि 50 मिनिटांनतर पुन्हा कोची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
विमानाने उड्डाण केल्यानंतर 50 मिनिटांनी वैमानिकाला इंजिनमधील तेलाची पातळी वेगाने कमी होत असल्याचे दिसले. यामुळे विमानाला पुन्हा कोचीला परतण्याचा निर्णय घ्यावा लागला. एका इंजिनवर अतिरिक्त वजनाच्या बोइंग 737 ला उतरवणे खूप धोकादायक ऑपरेशन असते. तरीही कोची विमानतळावर लँडिंग सुरक्षितपणे पूर्ण केले. यानंतर प्रवाशांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली. विमानात किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच एअर इंडिया एक्सप्रेस आणि डीजीसीएने या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
























































