चुकीच्या आराखड्यामुळे नऊ मजली इमारत बेकायदा ठरली; वास्तुविशारद, तत्कालीन नगररचनाकारावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमकुंज सोसायटीच्या पुनर्विकासात चुकीच्या आराखड्याला मंजुरी दिल्यामुळे नऊ मजली इमारत बेकायदा ठरली असून याप्रकरणी वास्तुविशारद प्रमोद पाटील आणि तत्कालीन नगररचनाकार विवेक गौतम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घोटाळ्यामुळे पुर्नविकास झालेली संपूर्ण ९ मजली इमारतच अनधिकृत ठरली असून सोसायटीच्या रहिवाशांची मोठी फसवणूक झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बदलापूर पश्चिमेतील सोनवली परिसरात प्रेमकुंज को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीचे अध्यक्ष विनोद मिरकुटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या सोसायटीने जुनी इमारत पुनर्विकासासाठी दिली होती. या पुनर्विकास प्रकल्पासाठी अंबरनाथ पूर्व येथील रहिवासी असलेले प्रमोद पाटील यांची स्थापत्य अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाटील यांनी बदलापूर नगर परिषदेत वास्तुविशारद म्हणून स्वतःची नोंदणी केली होती. वास्तुविशारद प्रमोद पाटील यांना नगर परिषदेच्या नियमांनुसार केवळ ५०० चौरस मीटर भूखंड क्षेत्रफळ, ३ मजले किंवा ११ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना मंजुरी देण्याचा अधिकार होता. मात्र त्यांनी अधिकाराचे उल्लंघन करत चक्क ९ मजली इमारतीचा सुधारित आराखडा बेकायदेशीरपणे नगर परिषदेत सादर केला, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी सुधारित आराखडा सादर केला तेव्हा त्यांच्याकडे नगर परिषदेचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. तरीही त्यांनी हा आराखडा मंजूर करून घेतला, असाही आरोप तक्रारीत आहे.

अशी झाली फसवणूक
दोघांच्या संगनमतामुळे इमारतीत १० सदनिका अनधिकृतपणे बांधण्यात आल्या. परवाना नसलेल्या वास्तुविशारदने केलेला आराखडा आणि तत्कालीन नगररचनाकाराने दिलेली चुकीची मंजुरी यामुळे ही संपूर्ण इमारतच आता अनधिकृत ठरली आहे. त्यामुळे रहिवाशांची फसवणूक झाल्याने अध्यक्ष विनोद मिरकुटे यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी वास्तुविशारद प्रमोद पाटील आणि तत्कालीन नगररचनाकार विवेक गौतम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.