
शौचालयात जाण्याच्या कारणावरून बिगारी काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यावर फरशीने घाव घालून त्याला नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या कापूरबावडी नाका परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू झाला असून राजू गुजराती (४०) असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह सिमेंट गोणी व रेक्झीनच्या कापडाने झाकल्याचे आढळून आले. दरम्यान तया घटनेप्रकरणी रसन मिश्रा व प्रल्हाद गौड यांना अटक करण्यात आली आहे.
राजू गुजराती हा कापूरबावडी पुलाखाली राहायचा. तसेच मिळेल ते बिगारी काम भागातील शौचालयात जायचा. सार्वजनिक शौचालयाचे काम पाहणाऱ्या गिरीशकुमार झा यांनी रात्री राजूला दोनजण मारहाण करत असल्याची माहिती शौचालयाचे कंत्राटदार राजू गांधी मिश्रा यांना फोनवरून दिली. मिश्रा घटनास्थळी पोहोचेपर्यंत संशयित दोघे तेथून निघून गेले होते. त्यानंतर गिरीशने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर दोघांनी शौचालयामागील नाल्यात बघितले असता राजूचे केवळ पाय दिसत होते. त्याचे शरीर सिमेंटच्या रिकाम्या गोण्या, रेक्झीनच्या बॅग व कचऱ्याने झाकण्यात आले होते.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने राजूला नाल्यातून बाहेर काढून उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा असून रक्तस्त्राव झाल्याचे तसेच डाव्या हाताच्या मागील बाजूस खरचटल्याचे आढळले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात टाकून कचऱ्याने झाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करत आहे.






















































