
यंदाचा ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच दिल्लीबाहेर गुजरातमधील केवडिया येथे आयोजित केला जात आहे. यावरून सध्या मोदी सरकारवर टीका होत आहे. यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”देशातील इतर राज्यांना गुजरातचं गुलाम करायच्या मनोवृत्तीतून मोदी शहा काम करतायत”, असे संजय राऊत म्हणाले.
”मुंबईमधल्या कंपन्या तुम्ही गुजरातमध्ये घेऊन जाता. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासारखा राष्ट्रीय उत्सव गेली 72 वर्ष देशाच्या राजधानीत होतोय तो देखील गुजरातला घेऊन चालले आहेत. मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत का? कॅबिनेट गुजरातचं आहे का? संपूर्ण देशाची संपत्ती, देशाचा अभिमान एका राज्याकडे वळवतायत, काय चाललाय हा प्रकार? राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीत व्हायला हवा. लोकांनी पुरस्कार घ्यायला गुजरातला का यावं ? लोकांनी बहिष्कार टाकला पाहिजे. ज्याला स्वाभिमान असेल त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे. राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा इतर कुठल्याही शहरात न होता देशाच्या राजधानीतच व्हायला पाहिजे. यांना दिल्लीचं व इतर राज्याचं महत्त्व कमी करायचं आणि या देशात गुजरात हे एकच राज्य आहे. बाकी सगळे गुजरातचं गुलाम आहेत अशा मनोवृत्तीतून मोदी शहा काम करतायत. गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत म्हणून त्यांना हा कार्यक्रम तिथे करायचा आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. म्हणूनच मोदींचे फोटो उतरवले त्याचे समर्थन होत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

























































