
गौतम अदानी यांच्यावरील आर्थिक फसवणुकीचे आरोप रद्दबातल करणाऱ्या अमेरिकी न्यायाधीशांनी याच प्रकरणातील अन्य पाच आरोपींवरील आरोप मागे घेण्याचा अमेरिकी न्याय विभागाचा (डीओजे) प्रस्ताव धुडकावून लावला आहे. संबंधित व्यक्तींच्या आरोप मुक्तीसाठी डीओजेने हिंदुस्थानच्या हवाल्याने सादर केलेले दावे परस्परविरोधी आहेत, असे न्यायाधीशांनी नमूद केले.
न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश निकोलस गाराफिस यांनी ऑगस्ट महिन्यात गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावरील आर्थिक फसवणूक व लाचखोरीचे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, गाराफिस यांनी इतर पाच आरोपींवरील दोन आरोपांबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. उर्वरीत आरोप रद्द करण्यासाठी ठोस आणि वस्तुस्थितीदर्शक कारणे 31 ऑगस्टपर्यंत द्या, असे आदेश न्यायालयाने ’डीओजे’ला दिले होते. त्यानंतर ’डीओजे’ने या संदर्भात दोन सविस्तर पत्रे पाठवली. मात्र, आरोप मागे घेण्याइतपत कोणताही नवीन पुरावा त्यातून समोर आला नाही, असे स्पष्ट करत न्यायाधीश गाराफिस यांनी हा प्रस्ताव अंशतः फेटाळून लावला.
आरोपी कोण आणि आरोप काय?
आरोपींमध्ये रणजित गुप्ता, सिरील पॅबेनेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांचा समावेश आहे. त्यांच्यावर फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट (एफसीपीए) अंतर्गत कट रचल्याचा तसेच न्यायदानाच्या प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.























































