
श्री गणरायांच्या आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा करण्यास परवानगी देणे समर्थनीय ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली, प्रतापगडावर अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मावळ्यांनी ‘डीजे’चा भूकंप घडवला नव्हता. टिळक मंडालेतून सुटून पुण्यात परतले तेव्हाही त्यांच्या स्वागताचे ‘डीजे’ वाजवले नव्हते हे पुणेकरांना कोणी सांगावे? ज्यांना मशिदीवरील भोंग्याचा त्रास होतो, आरोग्य बिघडते, भोंगे हे धर्मविरोधी आहेत, असे वाटते ते लोक ‘डीजे’च्या भूकंपाचे समर्थन करतात. त्यांनी विद्यानंद बापट यांना मारहाण केली. तरीही पुणेकरांनी ‘डीजे’विरोधात मोर्चा रविवारी काढलाच. तो मोर्चा म्हणजे पुणेकरांचा सार्वजनिक आवाज आहे. त्याचे श्रेय सार्वजनिक विद्यानंद बापट यांनाच द्यावे लागेल.
लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्याची सुरुवात पुण्यात झाली. त्याच पुण्यात गणेशोत्सवावरून ‘राडा’ सुरू झाला आहे. रविवारी जागरूक पुणेकरांनी सार्वजनिक उत्सवातील डीजे, स्पीकर, भोंगे यांच्या बेताल, कर्पश वापराविरुद्ध मोर्चा काढला. त्यास पुणेकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने पुणेकर रस्त्यावर उतरले हे महत्त्वाचे. पुण्याचा गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो, कधीकाळी तो अधिक सांस्पृतिक व परंपरागत होता आणि त्याचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला होता. आता उत्सवाचे रूपांतर एक प्रकारे ‘यादवी’त झाले. त्याविरोधात पुणेकर खडबडून जागे झाले. डीजे वगैरेंचा कर्णकर्पश वापर करून ‘उत्सव’वाले कोणता आनंद साजरा करणार आहेत? हा प्रश्न विचारला गेला आहे. गणपती हा जागरूक देव आहे. विद्या, कला, संस्पृतीचे प्रतीक आहे. तो जागाच आहे. मग त्याच्या आगमनाप्रसंगी ‘भूकंपा’प्रमाणे हादरे देणारे ‘डीजे’ का वाजवायचे? रामायणात युद्ध सुरू असताना रावणाला कुंभकर्णाची गरज भासली, पण त्याची झोप म्हणजे भयंकर होती. त्यामुळे त्याला जागे करण्यासाठी रावणाने नाना प्रकार केले. त्याच्या शरीरावर हत्ती चालवले, ढोल-नगारे, शंख फुंकले, भोवताली लोकांची गर्दी केली आणि कर्पश गर्जना करून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोठे कुंभकर्णाने डोळे उघडून आळोखे पिळोखे दिले. गणपती महाराजांना पुण्यातले तथाकथित उत्सववाले कुंभकर्ण समजलेत काय? किंबहुना या जागरूक गणपतीने आपल्या उत्सवातील ‘यादवी’ संपवण्यासाठी विद्यानंद बापट यांना वाहन म्हणून पाठवले व डीजे वगैरे भूकंपास विरोध घडवला, पण उत्सवी भक्तांनी त्या विद्यानंद यांच्यावरच हल्ला करून हिंदुत्वाची लक्तरे काढलेली दिसतात. ध्वनी प्रदूषण आरोग्याला घातक असल्याचा प्रश्न बापट यांनी मांडला. यावर बापट हे ‘नास्तिक’, ‘दिमागी नक्षल’ असल्याचा आरोप पुण्यातील शहाण्या अतिरेक्यांनी केला.
जागरूक सामान्य नागरिक
म्हणून एखाद्या विषयाला तोंड फोडणे यात आस्तिक-नास्तिक असण्याचा प्रश्न येतो कोठे? नास्तिक किंवा पुरोगामी असणे हा अपराध आहे काय? श्रद्धेचे अवडंबर व अंधश्रद्धेचा पसारा आणि त्यातून निर्माण झालेली अंधभक्ती म्हणजे हिंदू धर्म असा समज निर्माण करणाऱ्यांना बापट यांनी आव्हान दिले. विद्यानंद बापट हे बाहेरचे आहेत. मूळचे पुणेकर नाहीत असा कांगावा स्वतःस अस्सल पुणेकर म्हणवून घेणाऱ्या लोकांनी केला. पुण्यातील उत्सवांवर बोलण्याचा अधिकार बापटांना नाही हा या मंडळींचा दावा आहे. हा दावा मूर्खपणाचा आहे. इंग्रजांची दीडशे वर्षांची गुलामगिरी भारताने सहन केली. त्यांची राजवट म्हणजे ईश्वरी वरदान असल्याचा साक्षात्कार तेव्हा पुण्यातील काही ‘अस्सल’ मंडळींना झाला, पण या गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे सांगणारे टिळक हे पुणेकर नव्हतेच. ते रत्नागिरीतून पुण्यात आले. ज्या पेशव्यांचा अभिमान आजही पुणेकरांना आहे, ते पेशवेही मूळचे पुणेकर नव्हते. पेशव्यांचे मूळ आणि कूळ कोकणातले आहे. पुणेकरांना आज ज्यांचा म्हणून अभिमान वाटतो ते सर्व लोक पुण्याच्या बाहेरूनच आले. त्यामुळे एका सामान्य बापटाने ‘डीजे’च्या प्रश्नावर आवाज उठवला तर त्याला उपरे कसे ठरवता? पुण्याची बहुतेक संपत्ती, व्यवस्था, जमिनी आज ‘उपऱ्यां’च्या ताब्यात गेल्या, त्याबद्दल या ‘अस्सल’ पुणेकरांना ना खंत ना खेद! पुण्याची शान हरवली आहे. फर्ग्युसन काॅलेज, एस.पी. काॅलेज म्हणजे अक्षरशः महाराष्ट्राची काशी होती. गावोगावचे हुशार विद्यार्थी आपापल्या वास्तूंचा अभिमान घेऊन येत आणि मुठेचे पाणी पिऊन पुणेकर बनून जात. आयुष्य कोठेही गुजरावे, पण निवृत्तीनंतर पुण्यात येऊन तेथेच मातीत विलीन व्हावे. गायकवाड वाड्यावरून वाजत-गाजत ओंकारेश्वरी पोहोचावे हीच आशा त्यावेळी अनेक जण बाळगत असत. पुण्याची भाषा ही
महाराष्ट्राची भाषा
असे म्हटले जात होते. पुण्याचा वेष, रीतिरिवाज, परंपरा, साहित्य, उत्सव, चळवळी यांनी सारा महाराष्ट्र भारून टाकला होता. धनिक, शेठजींनी मुंबईला बहुरंगी-बहुढंगी बनवले होते, पण विद्वत्तेच्या जोरावर पुणेकर ताठ मानेने मुंबईला आव्हान देत होते. पुण्यात लोकहितवादी, फुले, चिपळूणकर, रानडे, गोखले, टिळक, आगरकर अशा मोठ्या तेजस्वी पुरुषांची मालिकाच निर्माण झाली. देशकार्यासाठीची ही रसद पुण्यानेच पुरवली. ही माणसे व संस्पृती पुण्याने पोसली त्या पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव हा वादाचा, दंगलीचा विषय ठरावा हे दुःखद आहे. ‘डीजे’चा भूकंपी आवाज ही आपली संस्कृती नाही. ‘डीजे’ हा एक व्यवसाय आहे व त्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून आहेत, हे खरेच आहे व या मुद्द्यावरसुद्धा तोडगा निघायला हवा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसंवादातून ‘डीजे’वर तोडगा काढण्याचा सल्ला दिला हा मूळ प्रश्नापासून पळण्याचा मार्ग आहे. कायदा काय म्हणतो ते सांगा. श्री गणरायांच्या आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा करण्यास परवानगी देणे समर्थनीय ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली, प्रतापगडावर अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मावळ्यांनी ‘डीजे’चा भूकंप घडवला नव्हता. टिळक मंडालेतून सुटून पुण्यात परतले तेव्हाही त्यांच्या स्वागताचे ‘डीजे’ वाजवले नव्हते हे पुणेकरांना कोणी सांगावे? ज्यांना मशिदीवरील भोंग्याचा त्रास होतो, आरोग्य बिघडते, भोंगे हे धर्मविरोधी आहेत, असे वाटते ते लोक ‘डीजे’च्या भूकंपाचे समर्थन करतात. त्यांनी विद्यानंद बापट यांना मारहाण केली. तरीही पुणेकरांनी ‘डीजे’विरोधात मोर्चा रविवारी काढलाच. तो मोर्चा म्हणजे पुणेकरांचा सार्वजनिक आवाज आहे. त्याचे श्रेय सार्वजनिक विद्यानंद बापट यांनाच द्यावे लागेल.






























































