
रोबोटला माणसासारखी स्पर्शाची जाणीव देण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. संशोधकांनी विकसित केलेल्या नव्या कृत्रिम त्वचेच्या मदतीने रोबोटिक हात एखाद्या वस्तूला स्पर्श न करताही तिची उपस्थिती जाणू शकतो आणि स्पर्श केल्यानंतर तिचा आकार तसेच ती कोणत्या पदार्थापासून बनली आहे, हे ओळखू शकतो. या संशोधनाचे निष्कर्ष
‘ऍडव्हान्स्ड मटेरियल्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या कृत्रिम त्वचेत दोन प्रकारच्या संवेदन क्षमतेचा वापर करण्यात आला आहे. विद्युत क्षेत्राच्या आधारे वस्तू जवळ आल्याचे समजते, तर वस्तूला स्पर्श केल्यानंतर निर्माण होणाऱ्या विद्युत संकेतांमधून तिच्याशी संबंधित माहिती मिळवली जाते. त्यामुळे रोबोटला केवळ दृष्टीवर अवलंबून राहावे लागत नाही. उदाहरणार्थ, एखादी वस्तू दिसायला सारखी असली तरी तिचा आकार किंवा पृष्ठभागाचा पदार्थ वेगळा असल्यास कृत्रिम त्वचा त्यातील फरक ओळखू शकते.
या प्रणालीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आली आहे. संशोधकांनी रोबोटिक हातावर ही त्वचा बसवून विविध वस्तूंच्या आकार आणि पदार्थाची ओळख करून घेतली. चाचण्यांमध्ये वस्तूचा आकार ओळखण्याची अचूकता शंभर टक्के, तर पदार्थ ओळखण्याची अचूकता 97.35 टक्के नोंदवण्यात आली. यामुळे भविष्यात रोबोटला वस्तू अधिक सुरक्षितपणे पकडणे आणि योग्य पद्धतीने हाताळणे शक्य होऊ शकते. कारखाने, गोदामे, घरगुती रोबोट, वैद्यकीय उपकरणे आणि माणसांसोबत काम करणाऱ्या यंत्रमानवांसाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होऊ शकतो. विशेषतः नाजूक किंवा वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तू हाताळताना स्पर्शाची माहिती मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. माणसाच्या त्वचेप्रमाणे रोबोटला स्पर्श, दाब आणि वस्तूचे गुणधर्म समजण्याची क्षमता मिळाल्यास यंत्रमानवांची काम करण्याची पद्धत अधिक अचूक आणि नैसर्गिक होण्याची शक्यता आहे. हीच क्षमता पुढे स्वयंचलित निवड, वर्गीकरण आणि वस्तूंची तपासणी यांसारख्या कामांमध्ये उपयोगी ठरू शकते. त्यामुळे पाहण्याबरोबरच स्पर्शातून निर्णय घेणारे रोबोट अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होऊ शकतील. मानवी सहकाऱ्यांसाठी सुरक्षित ठरेल.
स्पायडरमॅन































































