जबर इच्छाशक्तीसमोर साक्षात मृत्यूही ओशाळला! 11 दिवसांनंतर ढिगाऱ्यातून महिला जिवंत निघाली; नेपाळमधील रोमांचक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीसमोर साक्षात मृत्यूही ओशाळला! तब्बल11 दिवसांनंतर ढिगाऱ्यातून एक वृद्ध महिला जिवंत निघाली. नेपाळमधील या रोमांचक घटनेमुळे ‘जाके राखे साइयाँ, मार सके ना कोय’ या संतवचनाची प्रचितीच आली.

अकरा दिवसांपूर्वी तिबेटमध्ये झालेल्या भूकंपामुळे हिमालयन गिरीशिखरांवरील महाकाय हिमकडे कोसळून आलेल्या महापुराने नेपाळमध्ये अक्षरशः तांडव घातले. दीड हजारांपेक्षा जास्त लोकांचा या महापुराने बळी घेतला. अजूनही साडेचार हजार लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांच्या जिवंत असण्याची आशा आता मावळली आहे. पण नुवाकोट जिल्ह्यात एक चमत्कारच घडला!

नुवाकोट जिल्ह्याच्या बेत्रावती भागात वाहणाऱ्या त्रिशुली नदीमध्ये हिमालयाच्या डोंगररांगातून अजस्त्र मलबा वाहून आला. हा महाकाय भार सहन न झाल्यामुळे त्रिशुली नदीचे पात्रच बदलले. बिदूर भागात राहणाऱ्या ५५ वर्षीय चंदिका श्रेष्ठ या महिलेचे घर महापुराने उद्ध्वस्त केले. चंदिका श्रेष्ठ या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. अकरा दिवस झाल्यामुळे चंदिका या वाचण्याची आशा मावळली होती.

ढिगाऱ्याखालून क्षीण आवाज आला…

महापुराने वाहून नेलेल्या घराच्या ढिगाऱ्याखालून क्षीण आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शनिवारी पोलीस अधिकारी बिपीन रेग्मी यांनी आपल्या पथकाला तेथे पाठवले. पाठोपाठ बचावपथकही दाखल झाले. ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले. एका ठिकाणी खालून कण्हण्याचा अत्यंत क्षीण आवाज आला. अत्यंत काळजीपूर्वक ढिगारा बाजूला केल्यानंतर चंदिका श्रेष्ठ तेथे फसलेल्या दिसून आल्या.

अकरा दिवस ढिगाऱ्याखाली…

चंदिका श्रेष्ठ या ढिगाऱ्याखाली दबल्या होत्या. परंतु जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने त्यांनी प्रत्यक्ष मृत्यूवरही मात केली. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.