
हिंदुस्थानने महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा फडशा पाडला. पाकिस्तानचा संघ हिंदुस्थानच्या फिरकीच्या चक्रव्यूहात अडकला. हिंदुस्थानने पाकिस्तानचा अवघ्या ५५ धावांत खुर्दा उडवला. हिंदुस्थानच्या श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या ५६ धावांच्या आव्हानाचा लीलया पाठलाग करताना सात विकेट्स व ६८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. हिंदुस्थानचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. पाकिस्तानला २७ धावांची सलामी मिळाली, पण त्यानंतर फक्त २८ धावांत त्यांचा संपूर्ण डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. शेफाली वर्माने सलामीची जोडी फोडली. त्यानंतर श्री चरणीने फक्त सात धावांत तीन फलंदाजांना बाद केले, तर प्रेमाने नऊ धावांत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेफालीने दणक्यात सुरुवात केली, पण ६ चेंडूंत १२ धावा करून ती माघारी परतली. त्यानंतर हिंदुस्थानला स्वस्तात अजून दोन विकेट्स गमवाव्या लागल्या. पण कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद १८) आणि दीप्ती शर्मा (नाबाद १२) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
























































