शोधाशोध सुरूच… पाच हजार लोक अजूनही बेपत्ता; नेपाळमध्ये महापुरातील मृतांची संख्या 1 हजार 344 वर, 275 हिंदुस्थानींचा ठावठिकाणा नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळ-तिबेट सीमेवर 26 ऑगस्टला आलेल्या महापुरामुळे आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू झाला असून 5 हजार 300 जण बेपत्ता आहेत. यामध्ये 275 हिंदुस्थानी नागरिक आहेत. आतापर्यंत 169 हिंदुस्थानी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच त्रिशुली बाजार परिसरातून एका पाच वर्षांच्या चिमुकल्यासह तीन हिंदुस्थानी नागरिकांना 10 दिवसांनंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली.

चीनच्या तिबेट स्वायत्त क्षेत्रात अडकलेले 1 हजार 907 हिंदुस्थानी नागरिक सुरक्षितपणे नेपाळच्या हद्दीत परतले आहेत. पूरग्रस्त भागातून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर या महापुरातील मृतांचा आकडा 1344 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 12,000 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, अजूनही 5,000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके रात्रंदिवस शोधमोहीम राबवत आहेत. आमच्या माहितीनुसार 275 हिंदुस्थानी नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. आम्ही नेपाळ सरकारशी सतत संपका&त असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

चीनमधून 1,907 हिंदुस्थानी नेपाळला पोहोचले

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 1,907 हिंदुस्थानी नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळला पोहोचले आहेत. चीनच्या अधिकृत सूत्रांनुसार, तिबेट स्वायत्त प्रदेशात कोणताही हिंदुस्थानी प्रवासी अडकून पडलेला नाही.  दरम्यान, हिंदुस्थानने आतापर्यंत जवळपास 95 टन मदत आणि वैद्यकीय साहित्य नेपाळला पाठवले आहे.

11 व्या दिवशी वृद्ध महिलेची सुटका

नेपाळमध्ये आलेल्या महापुराच्या अकराव्या दिवशी नुवाकोटमधून एका 64 वर्षीय महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. ती तिच्या घराच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. बेपत्ता नागरिकांची अद्याप शोधमोहीम सुरू असून तब्बल 11 व्या दिवशी ही महिला सापडली. तिला मातीच्या ढिगाऱयाखालून सुखरूप बाहेर काढल्यानंतर तिला उपचारासाठी हेलिकॉप्टरने काठमांडूला नेण्यात आले आहे.