भयंकर! भरधाव कारची ट्रकला धडक,अपघातात तामिळनाडूच्या आठ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या थ्रिसुर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला असून, तामिळनाडूतील आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग-66 वरील कैपामंगलम येथे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. तामिळनाडूच्या दिंडीगुल येथील पीएसएम इंजिनिअरिंग कॉलेजचे हे विद्यार्थी कारमधून प्रवास करत होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू पासिंगची ही कार गुरुवायूरकडून कोडुंगल्लूरच्या दिशेने जात होती. महामार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे एका वळणावर उभ्या असलेल्या लॉरीवर ही भरधाव कार धडकली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रस्ता मोकळा असल्यामुळे कार वेगाने जाताना आणि धडकेनंतर तातडीने धुरळा उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे. अंधार आणि लॉरी उभी असल्यामुळे चालकाला अंदाज आला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. आतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी कारचा काही भाग कापावा लागला. स्थानिक नागरिक, तसेच अग्निशामक दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवले. या अपघातातील सर्व आठही जणांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह थ्रिसुर मेडिकल कॉलेजच्या शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आले आहेत.