
सणवार जवळ आल्यावर महिलांना पार्लरमध्ये जाण्याचे वेध लागतात. परंतु अनेकदा वेळ नसल्याने, पार्लरमध्ये जाणे जमत नाही. अशावेळी घरच्या घरीच आपण काही फेसपॅक करुन सौंदर्य खुलवू शकतो.
उन्हामुळे त्वचा निस्तेज होणे, तेलकटपणा आणि धूळ-मातीचा परिणाम जाणवणे अशा समस्या अनेकांना भेडसावतात. अशावेळी चंदन पावडरचा वापर करून घरच्या घरी सोपे फेसपॅक तयार करता येतात. चंदनामध्ये गुलाबजल, मध किंवा हळद मिसळून वेगवेगळे फेसपॅक बनवता येतात.
चंदन आणि गुलाबजल : एक चमचा चंदन पावडर आणि दोन चमचे गुलाबजल घेऊन त्याची घट्ट पेस्ट तयार करावी. चेहरा स्वच्छ केल्यानंतर हा फेसपॅक १० ते १५ मिनिटे लावून ठेवावा आणि नंतर पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटण्यास मदत होऊ शकते.
चंदन आणि मध : कोरडी किंवा निस्तेज त्वचा असल्यास एक चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा मध मिसळून पेस्ट तयार करता येते. हा पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवून नंतर धुवावा. मधामुळे त्वचेला मॉइश्चर मिळण्यास मदत होऊ शकते.
चंदन आणि हळद : एक चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा दूध घेऊन त्याची पेस्ट तयार करावी. ती चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावून नंतर स्वच्छ पाण्याने धुवावी.
नवीन कोणताही फेसपॅक वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास तो फेसपॅक वापरू नये.


























































