Women’s Asia Cup 2026 – हे दुर्मिळच! क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच असं घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Women’s Asia Cup 2026 मध्ये हिंदुस्थानने आपली दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात इंडोनेशिया आणि दुसऱ्या सामन्यात हॉंगकाँग यांना धुळ चारल्यानंतर हिंदुस्थानने आता आपला मोर्चा पाकिस्तानच्या दिशेने वळवला आहे. उद्या (5 सप्टेंबर 2026) उभय संघांमध्ये घमासान पाहायला मिळेल. मात्र, याच दरम्यान आशिया चषकामध्ये श्रीलंकाविरुद्ध इंडोनेशिया सामन्यात एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं ज्याची कल्पना क्रिडा विश्वाने यापूर्वी कधी केली नसावी.

श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंडोनेशियाविरुद्ध चमारी अट्टापट्टूने आपल्या गोलंदाजीची झलक दाखवून देत हॅट्रीक घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली. ही हॅट्रीक विशेष ठरली कारण ज्या फलंदाजांना सलग तीन चेंडूंमध्ये चमारीने तंबुचा रस्ता दाखवला. तेच तीन फलंदाज यापूर्वी सुद्धा सलग बाद झाले होते. यापूर्वी थायलंड आणि इंडोनेशिया या सामन्यात थायलंडची गोलंदाज फणीता माया हिने हॅट्रीक घेतली होती. या हॅट्रीकमध्ये तिने कदेक अरियानी (बोल्ड), न्योमन मेप्रियानी (LBW) आणि अगुंग लक्ष्मी (LBW) या तीन फलंदाजांना बाद केलं होतं. याच तीन फलंदाजांना तशाच पद्धतीने श्रीलंकेच्या चमारी अट्टापट्टूने बाद केलं आहे.